‘विदेशी’ला मागणी वाढली
By Admin | Updated: May 12, 2015 00:50 IST2015-05-12T00:21:55+5:302015-05-12T00:50:18+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात विदेशी मद्याची १४ टक्क्यांनी वाढीव विक्री झाली असून, देशीची विक्रीही ११ टक्क्यांनी वाढली आहे़

‘विदेशी’ला मागणी वाढली
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात विदेशी मद्याची १४ टक्क्यांनी वाढीव विक्री झाली असून, देशीची विक्रीही ११ टक्क्यांनी वाढली आहे़ अधिकृतरित्या दारूविक्री दुकानातील वार्षिक सरासरी जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी दुसरीकडे अवैध दारूची जिल्ह्यात विक्री जोरात आहे. अनेक गावातील ग्रामस्थांना अवैध दारूविक्री बंदीसाठी आंदोलने करावी लागत असली तरी छुप्या पध्दतीने दारूविक्री मात्र जोमात आहे़
शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग असो़़ राज्य मार्ग असो अथवा ग्रामीण भागातील रस्ते असोत बिअरशॉपी, बिअरबार, ढाब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे़ दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत असल्याने गावागावातील महिलांनी एकत्रित येवून दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला आहे़ गावागावात दारूविक्रीस बंदी असली तरी आजही खुलेआमपणे दारूची विक्री केली जात आहे़ प्रशासनाची कारवाई केवळ नावालाच असल्याचे दिसून येते़ जिल्ह्यातील परवानाधारक देशी-विदेशी दारूविक्रेत्यांकडे असलेले मद्य, बिअर, वाईन हे सन २०१३-१४ पेक्षा सन २०१४-१५ मध्ये सरासरी १० टक्क्यांनी वाढीव विक्री केल्याचे दिसून येत आहे़ आर्थिक वर्ष सन २०१३-१४ मध्ये ३११५८५४ बल्कलिटर देशी दारूची विक्री झाली होती़ तर सन २०१४-१५ मध्ये यात ११ टक्क्यांनी वाढ होत ३४५४९२९ बल्कलिटर देशी दारूची विक्री झाली़ विदेशी दारूच्या विक्रीत मागील वर्षी तब्बल १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ सन २०१३-१४ मध्ये १२६५०९० बल्कलिटर विदेशी मद्य विक्री झाले होते़ तर सन २०१४-१५ मध्ये १४४३०४६ बल्कलिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे़ देशी-विदेशीसह बिअरलाही जिल्ह्यातील तळीरामांनी चांगलीच पसंती दिल्याचे चित्र प्रशासनाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे़ सन २०१३-१४ मध्ये २६४२४८३ बल्कलिटर बिअरची विक्री झाली होती़ तर सन २०१४-१५ मध्ये यात ६ टक्क्यांनी वाढ होवून २८०४७६९ बल्कलिटर बिअरची विक्री झाली़ बिअरबरोबरच वाईनचेही शौकीन जिल्ह्यात वाढताना दिसत आहेत़ २०१३-१४ मध्ये १०८६१ बल्कलिटर वाईनची विक्री झाली होती यात २०१४-१५ मध्ये १३ टक्क्यांनी वाढ होत १२२५९ बल्कलिटर वाईनची विक्री झाली़
जिल्ह्यात देशीदारूच्या विक्रीत ११ टक्क्यांनी, विदेशीमध्ये १४ टक्क्यांनी, बिअरमध्ये ६ टक्क्यांनी तर वाईनच्या विक्रीत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ ही आकडेवारी परवानाधारक दुकानामधील असली तरी अवैध दारूविक्रीचा महापूर पाहता दारूविक्री यापेक्षाही मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने कारवाईचे सत्रही राबविले. सन २०१३-१४ मध्ये वारस ३३८ तर बेवारस ४६८ अशा एकूण ७९६ केसेस करण्यात आल्या होत्या़ यात ३३२ जणांना अटक करण्यात आली होती़ त्यांच्याकडून ४९ लाख ९६ हजार ७३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ सन २०१४-१५ मध्ये ६७० केसेस करण्यात आल्या आहेत़ यात वारस केसेस ३७४ व बेवारस केसेस २९६ करण्यात आल्या आहेत़ या कारवाईत ३८० जणांना अटक करण्यात आली होती़ तर वर्षभरात या कारवाईतून ७४ लाख ८२ हजार २११० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)