जीवनदायीच्या रुग्णाकडे लाचेची मागणी
By Admin | Updated: October 12, 2014 00:32 IST2014-10-12T00:32:33+5:302014-10-12T00:32:33+5:30
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मंजूर झालेले असताना घाटीत एका रुग्णाला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जीवनदायीच्या रुग्णाकडे लाचेची मागणी
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मंजूर झालेले असताना घाटीत एका रुग्णाला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत ही रक्कम दिली जाणार नाही, तोपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार नाही, असा दमच डॉक्टरांनी दिल्याचा आरोप रुग्णाच्या आईने केला
आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील भय्यासाहेब वाघमारे हा तरुण बिगारी काम करून वृद्ध आईसह उदरनिर्वाह चालवितो. बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करीत असताना इमारतीवरून पडल्याने त्याच्या पाठीच्या मणक्याला जबर मार लागला. त्यास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घाटीत जाण्याचा सल्ला दिला. भय्यासाहेबला घेऊन त्याची आई घाटीत आली.
आॅर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी त्यास १ सप्टेंबर रोजी वॉर्ड क्रमांक १३ मध्ये अॅडमिट केले. डॉक्टरांनी त्याची एक्स-रे तपासणी केली तेव्हा त्याच्या पाठीच्या मणक्याचे १२ नंबरचे हाड मोडले असल्याचे निदान करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेला पंधरा दिवस उलटल्यानंतर डिस्चार्ज देण्याची विनंती त्यांनी डॉक्टरांक डे केली तेव्हा दहा हजार रुपये दिल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. आम्ही गरीब असून एवढी रक्कम माझ्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर त्यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांच्याकडे तक्रार केली. डॉ. मगरे यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने अद्याप डिस्चार्ज मिळाला नसल्याचे रुग्णाच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये मंजूर झाले. १६ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला. निवासी डॉक्टरांनी रुग्णाच्या आईला बोलावून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगून रॉड टाकण्यात आला, त्याचे दहा हजार रुपये मागितले. नंतर रोज त्यांच्याकडे दहा हजार रुपये डॉक्टर मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चौकशी करतो - अविनाश मगरे
आॅर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी पैशाची मागणी केल्याची तोंडी तक्रार रुग्णाच्या आईने माझ्याकडे केली आहे. याबाबत चौकशी करीत आहे. तसेच अशा प्रकारे पैशाची मागणी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई प्रस्तावित केली जाईल. शिवाय त्या रुग्णावर उपचार सुरू आहेत, असे डॉ. मगरे म्हणाले.