अविनाश चमकुरे, नांदेडकधी नव्हे ऐवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत़ त्यामुळे कार्यकर्त्यांना सोन्याचा भाव आला आहे़ त्यात उन्हाचा पारा वाढल्याने प्रचारासाठी कार्यकर्त्यांकडून वातानुकूलीत वाहनांची मागणी होत आहे़ नांदेड जिल्हा क्षेत्रफळाच्या मानाने बराच मोठा आहे़ एकुण नऊ विधानसभा मतदारसंघातून १६४ उमेदवार नशीब आजमावत आहेत़ निवडणूकीस काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने गती घेतली आहे़ आपला उमेदवार कसा सरस हे सांगताना कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत़ मतदारापर्यंत पोहोचणे सोयीचे व्हावे, प्रवासादरम्यान उन्हाचा त्रास होवू नये यासाठी कार्यकर्ते उमेदवारांकडे वातानुकूलीत व आरामदायी वाहनांची मागणी करीत आहेत़ नांदेड शहरात आयटीआय, रजिस्ट्री आॅफीस, लातूर फाटा परिसरात दोनशेवर भाडोत्री वाहने उभे राहतात़ विधानसभा निवडणूकीसाठी जवळपास सर्व वाहने बूक असल्याने या ठिकाणी एकही वाहन सद्यस्थितीत उभे असल्याचे दिसून येत नाही़ निवडणूक काळात प्रचारासाठी वाहनांची मागणी वाढते याची पुरेपूर कल्पना वाहन मालकांना आहे़ या संधीचा लाभ घेत वाहनमालकांनी भाडे दर दुप्पट-तिप्पटीने वाढविले आहेत़ जादा पैसे देवूनही वाहन उपलब्ध होत नसल्याने काही उमेदवारांनी शक्कल लढवून शेजारील राज्यातून काही वाहने आयात केली आहेत़ तर काहींनी नातेवाईक, मित्रमंडळीकडील वाहने कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी ताब्यात घेतली आहेत़ वाहनांचे भाडे निवडणूक खर्चात मोजले जावू नये यासाठी उमेदवार व कार्यकर्ते पुरेपूर खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे़ निवडणूक नियमांचे उल्लंघन न होवू देता सोयीस्करपणे या वाहनांचा उपयोग कार्यकर्त्यांकडून केला जात आहे़ शिवाय प्रचाररथासाठी छोटा हाथी अॅपे या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ निवडणूक कामासाठी काही वाहने जिल्हा प्रशासनाने भाड्याने घेतली आहेत़ पोलिस दलाकडूनही या वाहनांचा वापर होत असल्याचे दिसून येते़ प्रचार संपेपर्यंत वाहनांची चणचण भासणार आहे़ तोवर गरजुंची गैरसोय होणार आहे़
प्रचारासाठी वातानुकूलीत वाहनांची मागणी
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST