राजस्थानच्या शिष्टमंडळाकडून पाहणी
By Admin | Updated: July 6, 2015 00:17 IST2015-07-06T00:11:46+5:302015-07-06T00:17:48+5:30
उस्मानाबाद : राजस्थानचे जलसंपदा राज्यमंत्री श्रीराम वेदिरे आणि जलस्त्रोत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली.

राजस्थानच्या शिष्टमंडळाकडून पाहणी
उस्मानाबाद : राजस्थानचे जलसंपदा राज्यमंत्री श्रीराम वेदिरे आणि जलस्त्रोत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणांचा सहभाग आणि या कामात मिळालेला लोकसहभाग याचे या शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले.
राज्यमंत्री वेदिरे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात राजस्थान ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीमंत पांडे, पंचायतराज सचिव अनंतकुमार, मनरेगा आयुक्त रोहीत कुमार यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, सीईओ सुमन रावत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. डी. सूर्यवंशी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद रेड्डी, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधवर आदींची यावेळी उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने सुरूवातीला पाडोळी येथे भेट दिली. तेथील नदीपात्र सरळीकरण आणि खोलीकरणाच्या कामाची पाहणी करून प्रत्यक्ष नागरिकांशीही चर्चा केली. या नदीत झालेले काम पाहून समाधान व्यक्त करतानाच कामाला गती येण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केल्या. त्यानंतर या शिष्टमंडळाने दारफळ येथील नाला सरळीकरण कामांची तसेच सारोळा येथील विविध कामांची पाहणी केली. शेतकरी गटाने सुरू केलेल्या फार्म प्रोड्युसिंग कंपनीला भेट दिल्यानंतर गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेल्या कामांची माहितीही त्यांनी घेतली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून शिष्टमंडळाला जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अभियानाची माहिती दिली.