देगलूरला उज्ज्वला पद्मावार यांची नगराध्यक्षपदी निवड
By Admin | Updated: August 15, 2014 00:05 IST2014-08-14T23:51:01+5:302014-08-15T00:05:45+5:30
देगलूर : देगलूर नगर परिषद अध्यक्षपदा निवडणूक प्रक्रियेत विजयमाला टेकाळे यांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने उज्ज्वला पदमवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला़

देगलूरला उज्ज्वला पद्मावार यांची नगराध्यक्षपदी निवड
देगलूर : देगलूर नगर परिषद अध्यक्षपदाच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस नगरसेविका विजयमाला टेकाळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला पदमवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला़ १६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष सभेत उज्ज्वला पदमवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याचे शिल्लक आहे़
काँग्रेस पक्षाला देगलूर नगर परिषदेत बहुमताचे संख्याबळ नसताना राष्ट्रवादीचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगत विजयमाला टेकाळे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले गेले़ प्रतयक्षात काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी टेकाळे यांच्या नावाला विरोध करीत राष्ट्रवादीशी संधान साधले आणि नामनिर्देशन माघारी घेण्याची नामुष्की आली़ विशेष सभेत चमत्काराची अपेक्षा बाळगून असणाऱ्यांना लढाईपूर्वीच शस्त्रे म्यान करावी लागली़
काँग्रेस नगरसेवक व पक्ष संघटना यामध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले़ काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले आणि आपलेच उघडे होईल असे दिसताच बिनविरोधांचे तरी श्रेय मिळावे यासाठी खटपटी केल्या गेल्या़ यातील आणखी एक मजेशीर बाब म्हणजे या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी शिवसेनेचे माजी आ़ सुभाष साबणे यांना साकडे घालण्यात आले़ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याला कोणतीही दाद न दिल्यामुळे टेकाळे यांना नामनिर्देशन माघारी घेण्याची वेळ आली़ दरम्यान, पदमवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट होताच कार्यकर्ते व पदमवार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला़ (वार्ताहर)