खातेवाटप लांबणीवर

By Admin | Updated: April 17, 2017 23:30 IST2017-04-17T23:29:38+5:302017-04-17T23:30:14+5:30

बीड : जिल्हा परिषदेची सत्ता काबिज केल्यानंतर युतीत शिक्षण व आरोग्य खात्यावरून चढाओढ लागली आहे

Deferred account expiration | खातेवाटप लांबणीवर

खातेवाटप लांबणीवर

बीड : जिल्हा परिषदेची सत्ता काबिज केल्यानंतर युतीत शिक्षण व आरोग्य खात्यावरून चढाओढ लागली आहे. सोमवारी खातेवाटप व विषय समिती सदस्य निवडीसाठी बोलावलेली पहिलीच सर्वसाधारण सभा एकमत होऊ न शकल्याने तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षा सविता गोल्हार यांच्यावर ओढावली. परिणामी खातेवाटप लांबणीवर पडले आहे.
जिल्हा स्काऊट गाईड भवनाच्या इमारतीत दुपारी दीड वाजता सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. अध्यक्षा सविता गोल्हार सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्षा जयश्री मस्के, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, महिला व बालकल्याण सभापती शोभा दरेकर, सभापती राजेसाहेब देशमुख, युद्धजित पंडित, सीईओ नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध १० समित्यांसाठीचे सदस्य निवडीबरोबरच खातेवाटप होणार होते. उपाध्यक्षा जयश्री मस्के व सभापती राजेसाहेब देशमुख या दोघांनीही शिक्षण व आरोग्य खात्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे पेच निर्माण झाला. शिवसंग्रामचे अशोक लोढा यांनी शिक्षण व आरोग्य खात्यासाठी मतदान घेण्याचा ठराव मांडला. मात्र, तो प्रलंबित ठेवत अध्यक्षा गोल्हार यांनी विविध १० समित्यांसाठी सदस्य निवडीची प्रक्रिया आधी घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार खातेनिहाय नामनिर्देशनपत्र मागविले. शिक्षण व आरोग्य खात्यासाठी मतदान घ्यावे लागेल, असे चित्र होते. मात्र, अध्यक्षा गोल्हार यांनी मतदान प्रक्रिया घेण्याऐवजी सभा तहकूब केली. त्यामुळे तीन तास केवळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. पुढील सभा दोन आठवड्यात केव्हाही होऊ शकते.
भाजप- शिवसंग्राममध्ये पुन्हा दरी ?
अध्यक्ष- उपाध्यक्ष व सभापती निवडीपर्यंत युतीत सारे काही अलबेल असल्याचे चित्र दिसून आले; परंतु खातेवाटपावरुन त्यांच्यात दरी निर्माण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. सत्ताधाऱ्यांतील बेबनावामुळे पहिलीच सर्वसाधारण सभा बारगळल्याने आगामी काळातही शह- काटशहाचे राजकारण रंगेल, असेच दिसते.
पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बिनसले होते; परंतु जि.प. सत्तास्थापनेपासून या वादावर पडदा पडला होता. अडीच वर्षांपूर्वी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांनी भाजपची बिनशर्थ साथ निभावली होती. आता मात्र, शिक्षण व आरोग्य खात्यावरुन भाजप- शिवसंग्राममध्ये दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Deferred account expiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.