निवेदनात नमूद केले की, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे १२ जानेवारी २०२०, १७ मार्च २०२०, १९ जुलै २०२० रोजी प्रत्यक्षात सभा न घेता खोटे व बनावट वृत्तांत व कागदपत्रे तयार करून चेअरमन व कार्यकारी संचालकांनी फसवणूक केली आहे. खोटा व बनावट दस्तावेज तयार करून तो खरा असल्याचे भासवून सभासदांची फसवणूक केली आहे. १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रकमेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी १८ नोव्हेंबर रोजी गंगापूर कारखान्याचे चेअरमन तथा आ. प्रशांत बंबसह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे कर्ज असून त्याची वसुलीसाठी २००८ मध्ये जप्तीची कारवाई केली होती. कारखाना बँकेच्या ताब्यात असला, तरी काही कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी संचालक म्हणून आमच्या सह्या घेतल्या जात होत्या. त्यावेळी आमचा चेअरमनवर विश्वास होता. दरम्यान बँकेशी तडजोड होऊन बँकेत ९ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. या रकमेची व्याजासहित १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ एवढी रक्कम झाली. ही रक्कम आमची संमती न घेता चेअरमन व प्रभारी कार्यकारी संचालकांनी काढून घेत वैजापूर मर्चंट बँकेत खोटे व बनावट खाते उघडून त्यात जमा केल्याचे दाखविले आहे. यासाठी घेण्यात आलेल्या ठरावावर धोक्याने आमच्या सह्या घेतल्या आहेत. या अफरातफर प्रकरणाशी आमचा संबंध जोडू नये. रकमेबाबत घेतलेल्या ठरावासंबंधी सखोल चौकशी करावी, अशी मागणी कारखान्याचे संचालक संजय जाधव, कचरू शिंदे, सुनीता गावंडे, बालचंद जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
साखर कारखान्यातील अफरातफरप्रकरणी चार संचालकांचा बचावात्मक पवित्रा
By | Updated: December 2, 2020 04:11 IST