घरभेद्यांमुळेच सेनेचा पराभव
By Admin | Updated: May 10, 2015 00:21 IST2015-05-10T00:12:39+5:302015-05-10T00:21:19+5:30
उस्मानाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याला माझा सुरुवातीपासून विरोध होता. मात्र पक्षातील काही जणांच्या आग्रहामुळे काँग्रेसबरोबर गेलो.

घरभेद्यांमुळेच सेनेचा पराभव
उस्मानाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याला माझा सुरुवातीपासून विरोध होता. मात्र पक्षातील काही जणांच्या आग्रहामुळे काँग्रेसबरोबर गेलो. मात्र काँग्रेस नेत्यांसह सेनेतील दोन्ही माजी आमदारांनी दगा फटका केल्याने माझा पराभव झाल्याचा आरोप जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबतचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचे सांगत, पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
जिल्हा बँकेची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध काढावी, अशी माझी भूमिका होती. पक्षश्रेष्ठींशी त्यानुसार चर्चाही झाली होती. मात्र सेनेपेक्षा काँग्रेस नेत्यांशी जास्तीची जवळीक असलेल्या सेनेतील काही जणांनी काँग्रेस बरोबर आघाडी करून निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. बँकेच्या संचालक पदासाठी मी इच्छुक नव्हतो. मात्र उभे राहण्याचा मला आग्रह करण्यात आला. उमेदवारी दाखल केल्यानंतर याच लोकांनी आतून मला पराभूत करण्याचे षडयंत्र रचले. त्यासाठीच काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कापसे यांना घेऊन त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी सहनिबंधक कार्यालयात गेलो मात्र आमदार मधुकरराव चव्हाण यांनी कापसे यांचा तुम्हालाच पाठींबा राहील, असा शब्द दिला. मात्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेत्यांसह शिवसेनेच्या दोन्ही माजी आमदारांनी मला पाडण्याचा चंग बांधला होता, हे स्पष्ट होत असल्याचेही सुधीर पाटील यावेळी म्हणाले. शिवसेनेच्या माजी आमदारांनी प्रामाणिकपणे काम केले असते तर शिवसेना -काँग्रेसची जिल्हा बँकेवर सत्ता आली असती, काँग्रेसबरोबरच्या मैत्रीमुळे प्रत्येकवेळी सेनेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात स्वबळ आजमावेल, आवश्यक तेथे कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसबरोबर छुपा समझोता झाला होता. जेथे सेनेचा उमेदवार असेल, तेथे काँग्रेसने उमेदवार द्यायचा नाही, असे ठरले होते. मात्र, त्यावेळीही सुषमा देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होता. काँग्रेसच्या या पाडापाडीच्या राजकारणाचा सेनेला फटका बसत आहे. त्यामुळे यापुढे अशा पध्दतीची अभद्र युती होवू देणार नाही, असे सुधीर पाटील यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांचीही उपस्थिती होती.
सुधीर पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ते अशा पध्दतीचे आरोप करीत आहेत. वास्तविक परंड्यातील आठपैकी सहा मते पाटील यांना गेली आहेत. काँग्रेसबरोबरची युती सर्वसंमतीनेच झाली होती. पक्षाला चेअरमनपद मिळणार होते. मग युती चुकीची होती, असे कसे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केली.
उस्मानाबादमधील अशक्यप्राय जागा जिंकल्याबद्दल जिल्हा प्रमुखांनी खरे तर आमचे अभिनंदन करायला हवे होते. मात्र, त्याऐवजी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले बेछूट आरोप चुकीचे असल्याचे माजी आ. ओम राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा माझा क्रमांक १ चा शत्रुपक्ष आहे. त्यामुळे कोणाशी छुपा समझोता करण्याचा प्रश्नच येत नाही. वैयक्तिक राजकारणात कसलाही रस नाही, असेही ते म्हणाले.