दीपावलीमुळे रेल्वे, बस गाड्या हाऊसफुल्ल!
By Admin | Updated: October 25, 2014 23:47 IST2014-10-25T23:31:57+5:302014-10-25T23:47:30+5:30
जालना : दीपावलीमुळे एस.टी.बसेस तसेच रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी कायम असून लांबपल्ल्याच्या काही बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

दीपावलीमुळे रेल्वे, बस गाड्या हाऊसफुल्ल!
जालना : दीपावलीमुळे एस.टी.बसेस तसेच रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी कायम असून लांबपल्ल्याच्या काही बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे गाड्या हाऊसफुल्ल होत असून अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
दीपावलीच्या तीन-चार दिवसांपूर्वीपासून बसेस व रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. लांबपल्ल्याचे प्रवाशी अगोदर आरक्षण करूनच प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे दिवसभर आरक्षण खिडकीवरही गर्दी असते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, नांदेड, यवतमाळ, इत्यादी भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
या लांबपल्यांच्या प्रवासाला जाण्यासाठी आरक्षण केल्याशिवाय जागा मिळणे मुश्किल आहे. त्यामुळे प्रवासी काही दिवस अगोदरच आपल्या जागेचे आरक्षण करीत आहेत. यापैकी काही ठिकाणच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून काही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे एस.टी. विभागातील सूत्रांनी सांगितले.
बसस्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी होते. यात अबालवृद्धांचा समावेश आहे. दिवाळीमुळे माहेरी जाणाऱ्या महिलांची संख्याही अधिक आहे. काही बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे प्रवाशांना बराच काळ स्थानकावर थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. विदर्भाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. रात्री उशिरापर्यंतच्या गाड्या विदर्भातूनच ये-जा करतात. मात्र बीड, सोलापूरकडे जाण्यासाठी रात्री १० नंतर बस मिळत नाही.
रेल्वेने तिरूपती, येल्लूर, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र काही गाड्या थेट तर काही ठिकाणी गाड्या बदलून जावे लागत असल्याने मुंबई, नांदेड, मनमाड, पूर्णा या ठिकाणापर्यंतचे तिकिट प्रवाशांकडून काढले जात आहे. अनेकदा वेळेवर बस किंवा रेल्वे उपलब्ध न झाल्यास काही प्रवाशी ट्रॅव्हल्स गाड्यांचा आधार घेताना दिसत आहे. (प्रतिनिधी)