खोलीकरण कामाची दोन ठिकाणाहून सुरुवात !
By Admin | Updated: May 16, 2016 23:51 IST2016-05-16T23:48:29+5:302016-05-16T23:51:42+5:30
कळंब : कळंब शहराशोजारील मांजरा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला काही जणांनी दुसऱ्या टोकापासून सुरुवात केल्याने समितीमध्येच दोन गट पडल्याची चर्चा आहे.

खोलीकरण कामाची दोन ठिकाणाहून सुरुवात !
कळंब : कळंब शहराशोजारील मांजरा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला काही जणांनी दुसऱ्या टोकापासून सुरुवात केल्याने समितीमध्येच दोन गट पडल्याची चर्चा आहे. शहरवासियांसह विविध सामाजिक संस्थांनी आर्थिक हातभार लावलेल्या या कामाचे नियोजन करावे, अशी मागणी आता पुढे येत आहे.
कळंब शहराशेजारील मांजरा नदीच्या पात्राचे २८०० मिटर रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम मांजरा खोलीकरण समितीच्या नावाखाली हाती घेण्यात आले आहे. यासाठी सव्वाकोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या कामामुळे पात्राशेजारील शेतीची पाणीपातळीत वाढ होणार आहे. तसेच या शेतकऱ्यांना या खोलीकरणामुळे साठवणूक केलेले पाणीही उपलब्ध होणार आहे. १ मे पासून पात्राशेजारील महादेव मंदिरापासून हे काम सुरु करण्यात आले होते. हे काम सलग होणे अपेक्षित असतानाच काही मंडळींनी परळी रोडजवळील मांजरा नदी पात्रातील जुन्या पुलापासून काम सुरु केले आहे. याठिकाणी जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टरने काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रणा विभागली गेल्याने दोन्ही ठिकाणच्या कामाचा वेग मंदावला आहे. पावसाळ्यापूर्वी बहुतांश काम पूर्ण करावे लागणार असल्याने या दोन्ही कामावरची यंत्रणा एकाच ठिकाणी कार्यान्वित करण्याची मागणी शहरवासियांतून होत आहे.
या कामाला काही दिवसांपूर्वी तज्ज्ञ अभियंत्यांनी भेट देवून कामाबाबत सूचना केल्या होत्या. त्या सुचनांचे पालन करण्याबरोबरच या कामांचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याची सध्या आवश्यकता आहे. समितीने हे काम पोकलेन, जेसीबी तसेच ट्रॅक्टर, टिप्पर ३ वाहनांना तासाच्या हिशोबाने दिल्याने कामाला उरक येईना झाला आहे. हे काम मोजमापाने संबंधित यंत्रचालकांना दिल्यास काम लवकर होण्यास मदत होईल. त्यामुळे वेळ व पैसाही वाचेल. याकडेही समितीने लक्ष देवून निर्णय घेण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)