कपातीचे धोरण
By Admin | Updated: July 28, 2014 01:00 IST2014-07-28T00:25:32+5:302014-07-28T01:00:33+5:30
नांदेड : महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी व खर्चात बचत करण्यासाठी शहरातील सहा ऐवजी चार क्षेत्रीय कार्यालय स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़

कपातीचे धोरण
नांदेड : महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी व खर्चात बचत करण्यासाठी शहरातील सहा ऐवजी चार क्षेत्रीय कार्यालय स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़
व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे एलबीटीमुळे मनपाचे उत्पन्न घटले असून पारगमन शुल्क वसुलीतून विशेष महसूल मिळत नाही़ यासाठी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत़
या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सहा क्षेत्रीय कार्यालयांची संख्या घटविण्याचा विचार केला असून त्याद्वारे खर्च कपातीचे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरात झोन क्रं़ १ शिवाजीनगर, झोन क्रं़ २ अशोकनगर, झोन क्रं़ ३ इतवारा, झोन क्रं़ ४ वजिराबाद, झोन क्रं़ ५ सिडको व झोन क्रं़ ६ तरोडा अशी सहा क्षेत्रीय कार्यालये सुरू आहेत़
याठिकाणी असलेले कर्मचारी व कार्यालयाचा वाढता खर्च कमी करण्याच्या उद्दिष्टाने दोन क्षेत्रीय कार्यालये कमी करून त्यांचे कामकाज विभागून चार क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपविण्यात येणार आहे़
या निर्णयामुळे क्षेत्रीय कार्यालयांवर होणारा खर्च कमी होवून हा खर्च मनपाच्या तिजोरीत जमा होणार आहे़ प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे़
दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी शहरात महत्वाच्या ठिकाणी एकूण साडेचारशे गाळे निर्माण करण्यात येत आहेत़
तसेच बांधकाम परवान्यातून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ सध्या बांधकाम परवान्यातून अडीच कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे़ (प्रतिनिधी)