‘रेणा’ बॅरेजेसच्या पाण्यात घट
By Admin | Updated: January 9, 2017 23:30 IST2017-01-09T23:26:59+5:302017-01-09T23:30:22+5:30
रेणापूर : जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़

‘रेणा’ बॅरेजेसच्या पाण्यात घट
रेणापूर : शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे म्हणून रेणा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा झाला़ मात्र जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़ परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच भेडसावणार आहे, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे़
रेणापूर तालुक्यातील रेणा नदी व जवळच्या मांजरा नदीवर बॅरेजेस बांधण्यात आले़ तसेच या नदीचे मोठ्या प्रमाणात खोलीकरणही करण्यात आले़ रबीमध्ये हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली़ पिके जोमात आली असली, तरी पुढे पिकांना पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत़ जानेवारीच्या सुरुवातीलाच या बॅरेजेसमधील पाणी पातळी ५० टक्केपेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ रेणा नदीवर रेणापूर, घनसरगाव, जवळगा या ठिकाणी बॅरेजेस बांधण्यात आले़ परंतु या बॅरेजच्या पाण्यात मोठी घट झाली आहे़ शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची आशा दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ बॅरेजेसमधून रेणापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो़