उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: June 24, 2014 00:31 IST2014-06-24T00:31:39+5:302014-06-24T00:31:39+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी २५ जून रोजी पूर्ण होत आहे.

उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी २५ जून रोजी पूर्ण होत आहे. या अनुषंगाने नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरूवारी संबंधित नगर परिषदेत विशेष सभांचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांच्या उपाध्यक्षांची निवड २६ डिसेंबर २०११ च्या पहिल्या विशेष सभेत करण्यात आली होती. त्यांचा पदावधी २५ जून २०१४ रोजी पूर्ण होत आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा , मुरुम, कळंब , भूम व परंडा या आठ पालिकांच्या उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी नुकताच जाहीर केला आहे. यासाठी २६ जून रोजी संबंधित नगर परिषदेत उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. या विशेष सभेचे अध्यक्ष पिठासीन अधिकारी म्हणून संबधित तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवारांना सकाळी १०.३० दुपारी १२.३० या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. दुपारी १२.३० ते १ या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून, वैध उमेदवारांची नावे १.१० वाजता वाचून दाखविली जाणार आहेत. दुपारी १.१५ ते १.३० या वेळेत उमेदवारी मागे घेता येणार असून, यानंतर १.३५ वाजरता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे.(प्रतिनिधी)
कळंबच्या निवडीला स्थगिती
कळंब- कळंबच्या उपनगराध्यक्षपदासाठी २६ जून रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कळंबचे उपनगराध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी नगराध्यक्षपदासारखेच उपनगराध्यक्षपदाच्या निवडीला स्थगिती द्यावी, यासाठी अॅड. उत्तमराव बोंदर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी खंडपीठाचे न्या. आर. एम. डोई व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्यासमोर झाली. यावेळी खंडपीठाने पुढील आदेश येईपर्यंत या निवडीला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती अॅड. उत्तम बोंदर यांनी दिली. दरम्यान न्यायालयाच्या या आदेशाने न. प. वर्तुळात तापलेले राजकीय वातावरण सध्यातरी थंड झाले आहे. कळंब न. प. मध्ये सध्या सेना, काँग्रेस युती आहे. न. प. मध्ये काँग्रेस पूर्ण बहुमत असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकाला यंदा उपनगराध्यक्षपदासाठी संधी दिली जाणार होती.