मुदतवाढीची घोषणा; लेखी आदेशच नाहीत !
By Admin | Updated: April 16, 2017 23:11 IST2017-04-16T23:08:34+5:302017-04-16T23:11:28+5:30
लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.

मुदतवाढीची घोषणा; लेखी आदेशच नाहीत !
लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात नाफेडच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात रविवारी सायंकाळपर्यंत कुठलेही आदेश आले नसल्याने सोमवारपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.
यंदा अपेक्षेपेक्षा जास्त तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारपेठेत तुरीची आवक वाढली. परिणामी, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून ९ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने महिन्यातून किमान तीन-चार वेळा टाळे लागत होते.
सुरुवातीस १५ मार्चपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू राहणार होते. परंतु, होणारी आवक पाहता त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर बारदाण्याचा तुटवडा असल्याने तुरीचा मापतोल करण्यास चार-चार दिवसांचा विलंब लागत होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते.
गुरुवारी अचानकपणे १५ एप्रिलपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्याचे नाफेडने आदेश दिले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान, राज्य शासनाकडून आठवडाभर मुदतवाढीची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात लेखी आदेश नाफेडच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले नाहीत. याउलट खरेदी केंद्रावर असलेल्या सर्व तुरीचे मापतोल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ज्या केंद्रांवर मापतोल झाला आहे, तेथील केंद्र बंद झाले आहे. (प्रतिनिधी)