नवमतदार ठरणार निर्णायक घटक

By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-06T23:57:09+5:302014-10-07T00:14:50+5:30

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने

Decisive factor will be the newcomer | नवमतदार ठरणार निर्णायक घटक

नवमतदार ठरणार निर्णायक घटक


जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने या निवडणुकीत नवमतदारांचा टक्का निर्णायक ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत नवमतदारांचा मोठा बोलबाला सुरु आहे. विशेषत: हा मतदार कमालीचा जागरुक झाला असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांनी या नव्या मतदारांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच त्या-त्या मतदारसंघात नवमतदारांना आकर्षिक करण्याकरिता मातब्बर पुढारी ऐनकेन प्रकारे प्रयत्न करीत आहेत. विशेषत: नवमतदारांना त्या-त्या कार्यक्षेत्रात दरवर्षी करिअर गाईडन्स, नोकरी महोत्सव, स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य वगैरेचे आमिष दाखविले जात आहे.
या विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत एकूण १४ लाख ९५ हजार ३६९ मतदार होते. निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत १ लाख ६ हजार १०३ नवमतदारांनी नोंदणी केली. तसेच मार्च महिन्यात एक दिवसीय नोंदणी अभियान राबविण्यात आले. यातही २९ हजार ५६५ मतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केली. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील मतदारांच्या संख्येत १ लाख ३५ हजार ६६८ ने वाढ झाली. यात ७३ हजार १९२ पुरूष तर ६२ हजार ४७६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक मतदार वाढले. व या नवमतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. या विधानसभेतही नवमतदार उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेईल, असा अंंदाज आहे. यंदाच्या निवडणुकीला युवा वर्गामध्ये मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी युवकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्स-अप या सोशल नेटवर्किंग माध्यमांसह टीव्ही वरील जाहिरातींमुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसत आहे. जालना शहरातील विविध सामाजिक संघटनाही मतदानाच्या जागृतीविषयी सरसावल्या आहेत. निवडणूक विभागाच्या वतीनेही शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, मोबाईल व्हॅन, संकल्प पत्र भरून घेणे या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचे उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणार आहे, हे निश्चित. (प्रतिनिधी)

Web Title: Decisive factor will be the newcomer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.