जनमताचा कौल घेऊन निर्णय घेणार

By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:24:57+5:302014-07-23T00:41:20+5:30

वेरूळ : ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन पुरुषांनी घेताना कंबरेवरील वस्त्रे काढावीत की पूर्ण वस्त्रानिशी दर्शनास परवानगी द्यावी, याबाबत जनमताचा कौल घेऊन निर्णय निश्चित केला जाईल

The decision will be taken by taking public opinion and taking decisions | जनमताचा कौल घेऊन निर्णय घेणार

जनमताचा कौल घेऊन निर्णय घेणार

वेरूळ : ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन पुरुषांनी घेताना कंबरेवरील वस्त्रे काढावीत की पूर्ण वस्त्रानिशी दर्शनास परवानगी द्यावी, याबाबत जनमताचा कौल घेऊन निर्णय निश्चित केला जाईल, असे देवस्थान ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या पुरुषांना कंबरेवरील वस्त्रे काढावी लागतात. या प्रचलित प्रथेमागे कुठलाही शास्त्रीय किंवा धार्मिक आधार नाही, असे संत संमेलनाचे अखिल भारतीय परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते बाबा हट्टयोगी यांनी सांगून नाशिक येथील सिंहस्थात या मुद्यावर साधू-संत मंथन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत संत आखाडा निर्णय घेणार असून तो मंदिर ट्रस्टला कळविला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर ही प्रचलित प्रथा चालू ठेवायची की बंद करायची, याचा निर्णय घेण्यासाठी देवस्थान ट्रस्टने जनमत जाणून घ्यायचे ठरविले आहे. त्यासाठी मंगळवारपासून मंदिरात ट्रस्टने एक रजिस्टर ठेवले असून त्यावर भाविकांचे अभिप्राय घेतले जाणार आहेत. भाविक बहुमताने जो अभिप्राय देतील, त्यानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य यांनी सांगितले. मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांनी प्रवेश करताना कंबरेवरील वस्त्रे काढण्यास कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे ट्रस्टने सुद्धा मान्य केले आहे. आता या प्रथेवर संपूर्ण श्रावण महिनाभर भाविकांचे मत जाणून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रचलित प्रथेशी गावकरी सहमत आहेत आणि त्यांनी ही प्रथा बंद करण्यास विरोध दर्शविला आहे. ही प्रथा बंद केल्यास कडाडून विरोध केला जाईल, असे भारत जाधव, रमेश मिसाळ, साहेबराव पांडव आदी ग्रामस्थांनी सांगितले. प्रचलित प्रथेचे वेरूळच्या सरपंच रेखा ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले आहे. त्याचबरोबर ट्रस्ट काय निर्णय घेते याकडे आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
त्र्यंबकेश्वरच्या धर्तीवर दर्शन ठेवावे
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त पूजारीच राहतात आणि भाविकांना दरवाजातूनच दर्शन दिले जाते. याकडे ग्रामपंचायत सदस्य सतीश फुलारे यांनी लक्ष वेधून तशी प्रथा वेरूळमध्ये सुरू करण्याची सूचना केली.

Web Title: The decision will be taken by taking public opinion and taking decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.