पाणीपुरवठ्याचा निर्णय बारगळला
By Admin | Updated: August 26, 2014 00:43 IST2014-08-26T00:43:46+5:302014-08-26T00:43:46+5:30
नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आजच्या स्थायी समितीच्या सभेत बारगळले़ सभापती उमेश पवळे यांनी

पाणीपुरवठ्याचा निर्णय बारगळला
नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आजच्या स्थायी समितीच्या सभेत बारगळले़ सभापती उमेश पवळे यांनी सुचविलेल्या पर्यायाला सदस्यांनी ठोकरले़ त्यामुळे हा ठराव आता सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे़ पाणीटंचाईचे सावट असताना काही सदस्यांनी मात्र पाण्यावरून राजकारण सुरू केल्याची चर्चा सुरू होती़
स्थायी समितीची सभा आज दुपारी १२ वाजता सभापती उमेश पवळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वाची मानली जात होती़ मात्र सव्वातास चाललेल्या या सभेत केवळ सात प्रस्ताव मंजूर झाले़ शहराच्या पाणी पुरवठा विषयावर सदस्यांनी सभापतींच्या निर्णयाला विरोध दर्शविला़ त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली़
विष्णूपुरी प्रकल्पात सध्यस्थितीत ८़८३ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने व पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा धोरणात बचत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता़ यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकारी स्थायी समितीला असल्याचे नमूद करीत आयुक्तांनी तसे पत्र सभापती पवळे यांना दिले होते़ आठ दिवसातून एकवेळेस पाणी सोडल्यास नागरिकांना पाणीसाठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे सभापती पवळे यांनी शहराला दोन दिवसआड पाणी सोडण्याचे वेळापत्रक कायम ठेवून केवळ पाणी सोडण्याच्या वेळेत बचत करण्याचा निर्णय सभेसमोर मांडला़ मात्र या विषयावर चर्चा करण्यास सदस्य तयार नव्हते़ सरजितसिंघ गील यांनी हा विषय सर्वसाधारण सभेसमोर मांडण्याची सूचना केली़
परंतु हा विषय स्थायी समितीचा असल्याने तो या सभेत मंजूर होणे गरजेचे असल्याचे सांगत सभापती पवळे यांनी आपला आग्रह कायम ठेवला़ परंतु इतर सदस्यांनी त्यास विरोध दर्शवित सभापतींची कोंडी केली़ आचारसंहितेपूर्वी सर्वसाधारण सभा घेणे आशक्य असल्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवू नये, अशी भूमिका सभापतींनी घेतली़ मात्र त्यांचा नाईलाज झाल्यामुळे स्थायी समिती तहकूब करण्यात आली़
प्रारंभी सात ठराव मंजूर करण्यात आले़ विविध घाटावर जिवरक्षक तैनात करण्यात येतात़ या जीवरक्षकांचे मानधन वाढविण्याची मागणी करण्यात येत होती़ जीवरक्षकास प्रति दिवस २०० रूपये व प्रति तराफा अडीच हजार रूपये एवढे मानधन देण्यात येते़ त्यामध्ये जीवरक्षकांच्या मानधनात ५० रूपयांची वाढ करून प्रति दिवस अडीचशे रूपये मानधन करण्यात आले़
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातंर्गत नागरी दलित्तेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे़ शक्तीनगर जलकुंभावरील वितरण व्यवस्था स्वतंत्र करण्यासाठी ५० टक्के अनुदान प्राप्त झाले़ त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या़ त्यात ठेकेदारांनी ९ टक्के जास्त दराऐवजी अंदाजपत्रक दरापेक्षा ४़१० टक्के जास्त दराने काम करण्यास लेखी संमती दिली़ सभेस आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, विनय गिरडे, मोहिनी कनकदंडे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)