नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:04 IST2017-09-17T01:04:02+5:302017-09-17T01:04:02+5:30
नाल्यातील अतिक्रमणे पुढील आठवड्यापासून काढण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.

नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बुधवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील असंख्य वसाहतींमध्ये पाणी शिरले. हजारो घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. सखल भाग संपूर्ण जलमय झाला होता. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाहच मिळायला तयार नाही. जिथे जागा मिळेल तेथून पाणी बाहेर पडत आहे. नाल्यातील अतिक्रमणे पुढील आठवड्यापासून काढण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.
गुरुवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जयभवानीनगरसह शहरातील प्रमुख नाल्यांची पाहणी केली. शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांनीही नाल्यांची पाहणी करून महापालिका अधिकाºयांची जोरदार खरडपट्टी केली. पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौºयातून मनपाच्या दोन वरिष्ठ अधिकाºयांनी अंग काढून घेतले होते. तोफेच्या तोंडी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना देण्यात आले होते.
शनिवारी नाल्यांच्या मुद्यावर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, जयभवानीनगर येथे नाल्यातून ड्रेनेजलाइन टाकण्याचा अगोदर निर्णय झाला होता. राजकीय मंडळींनी अतिक्रमणे न पाडता लाइन टाका, असा आग्रह धरला. नंतर ड्रेनेज लाइनचा मार्ग बदलावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे अतिक्रमणे काढण्याचे राहून गेले. नाल्यात १३५ अतिक्रमणे आहेत, ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून लवकरच कारवाई करण्यात येईल. आयुक्तांनी पुढच्या आठवड्यात कारवाईला सुरुवात होईल, असा आशावाद व्यक्त केला. शहरातील इतर नालेही मोकळे करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.