परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय
By Admin | Updated: March 27, 2015 00:44 IST2015-03-27T00:40:55+5:302015-03-27T00:44:15+5:30
औरंगाबाद : विद्यापीठाच्या काही संलग्नित महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पत्रकारिता व ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली

परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही संलग्नित महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पत्रकारिता व ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आणि परीक्षा मंडळाने विनाव्यत्यय ती मान्यही केली. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने विद्यापीठ वर्तुळात प्रश्न उपस्थित झाला आहे की, दोष कोणाचा आणि शिक्षा कोणाला?
विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाची ६ आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रम शिकविणारी ६, अशी एकूण १२ खाजगी महाविद्यालये कार्यरत असून, जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. यापैकी बहुतांश महाविद्यालयांमध्ये नियमानुसार पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. शिकविण्यासाठी पात्र शिक्षक नाहीत. तरीदेखील अशा महाविद्यालयांना विद्यापीठ दरवर्षी विनाअट संलग्नता देते.
या महाविद्यालयांमध्ये पात्र शिक्षकच नसल्यामुळे नियमित वर्ग होत नाहीत. मग, विहित कालावधीत ते अभ्यासक्रम पूर्ण करणार कसा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तरीदेखील शिक्षण संस्थाचालक काही मंडळींना पकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतात. ही मागणी परीक्षा मंडळाच्या बैठकीत विनाव्यत्यय मान्यही होते. शिक्षण संस्थाचालकांची ही खेळी विद्यापीठाच्या विकासासाठी मारक ठरणार असून, कुलगुरूंनी अशा संस्थाचालकांच्या मागण्यांना भीक न घालता कडक भूमिका घ्यावी, अशी यानिमित्ताने मागणी पुढे आली आहे. खाजगी महाविद्यालयांतील ग्रंथालयशास्त्र आणि पत्रकारितेच्या दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या दोन्ही विद्याशाखांच्या परीक्षा आज गुरुवारपासून (२६ मार्च) सुरू होणार होत्या, त्या आता १० एप्रिलपासून घेतल्या जातील, असे विद्यापीठाच्या परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.