३४५ वस्तीशाळा शिक्षकांचा १० डिसेंबरला फैसला
By Admin | Updated: December 7, 2015 01:00 IST2015-12-07T00:39:33+5:302015-12-07T01:00:12+5:30
बीड : जिल्ह्यातील ३४५ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद सीईओंनी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १० डिसेंबर रोजी या सर्व शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

३४५ वस्तीशाळा शिक्षकांचा १० डिसेंबरला फैसला
बीड : जिल्ह्यातील ३४५ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद सीईओंनी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १० डिसेंबर रोजी या सर्व शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा फैसला होणार आहे.
२३ मार्च २०१५ रोजी शालेय शिक्षण विभागाने वस्तीशाळा शिक्षकांचे आदेश रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला वस्तीशाळा शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यानुसार खंडपीठाने वस्तीशाळा शिक्षकांचा निर्णय जिल्हा परिषदेने आपल्या स्तरावर घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुषंगाने सीईओ नामदेव ननावरे यांनी यापूर्वी बंद वस्तीशाळेवरील शिक्षकांना अंतिम नोटीस बजावून त्यांची सुनावणी घेतली होती. पाठोपाठ नियमित ३४५ वस्तीशाळा शिक्षकांनाही शनिवारी नोटीस काढली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कायम प्राथमिक शिक्षकांचे वेतन मान्य पदांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असल्याने एक वर्षांपासून झालेले नाही. कायम सेवेतील शिक्षकांचे वेतन होण्याच्या अनुषंगाने आपली नियुक्ती रद्द करून जागा रिक्त करणे व रिक्त जागेवर दीर्घकाळ कार्यरत शिक्षकांची नियुक्ती करून त्यांचे वेतन सुरू करणे आवश्यक असल्याचे नोटिशीत नमूद आहे. बिंदू नामावलीही तपासली नव्हती. त्यामुळे आपली नियुक्ती रद्द का करण्यात येऊ नये ? असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, १० डिसेंबर रोजी सीईओ नामदेव ननावरे यांच्या दालनात ३४५ शिक्षकांची वैयक्तिक सुनावणी होणार आहे. यावेळी लेखी खुलासाही सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या बाबतीत निर्णय होईल.
जि. प. मध्ये प्राथमिक शिक्षकांची ८ हजार ७६४ पदे मंजूर आहेत. वस्तीशाळा शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी ३१ जुलै २००९ व २७ सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे निकष आहेत. निकष पूर्ण न करणाऱ्यांना नियुक्त्या देण्यात येणार नाहीत.
याशिवाय ज्या शाळेतील शिक्षकांचे पद मंजूर नाही किंवा ज्या शिक्षकांना पायाभूत पदांमध्ये नियुक्ती नाही अशांचे वेतन अदा केले जाणार नाही. (प्रतिनिधी)