मृतदेह घरात सोडून मायलेकी पळाल्या
By Admin | Updated: March 1, 2017 01:16 IST2017-03-01T01:15:41+5:302017-03-01T01:16:20+5:30
विडा : केज तालुक्यातील विडा येथील नारायण भिवाजी दुनघव वय (५५) या मजुराचा सोमवारी रात्री गूढ मृत्यू झाला.

मृतदेह घरात सोडून मायलेकी पळाल्या
विडा : केज तालुक्यातील विडा येथील नारायण भिवाजी दुनघव वय (५५) या मजुराचा सोमवारी रात्री गूढ मृत्यू झाला. मंगळवारी मयताची पत्नी तीन मुलींसह गायब झाल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे.
नारायण दुनघव हे पत्नी राजूबाईसमवेत विडा येथे वास्तव्यास आहेत. त्यांना तीन मुली असून एकीचे लग्न झालेले आहे; पण ती नांदत नाही. उर्वरित दोघी अनुक्रमे १७ व १४ वयाच्या आहेत. विवाहित मुलगी माहेरीच राहते. मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबातील नारायण दुनघव यांचा सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. मात्र, पत्नी राजूबाई व त्याच्या तिन्ही मुलींनी ही बाब कोणालाही सांगितली नाही.
मंगळवारी सकाळी दहा वाजता नारायण दुनघव यांचा मृतदेह घरातच ठेवून या राजूबाई तिन्ही मुलींसह गायब झाली.
दरम्यान, शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर केज ठाण्याचे फौजदार अनंत वाठोरे, जमादार मंगेश भोले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मयत नारायण यांच्या अंगावर कुठलेही व्रण नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे गूढ कायम आहे.
पप्पू कान्होबा दुनघव यांच्या खबरीवरुन केज ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार अंनद वाठोरे करत आहेत. (वार्ताहर)