कर्ज माफ, डिझेल दर कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:56+5:302021-02-05T04:18:56+5:30
औरंगाबाद : मागील ११ महिन्यांत डिझेलचे दर लिटरमागे १६ रुपयांनी वाढले आहे. माल वाहतूक भाड्यातील सर्वांत जास्त खर्च डिझेलमध्येच ...

कर्ज माफ, डिझेल दर कमी करण्याची मागणी
औरंगाबाद : मागील ११ महिन्यांत डिझेलचे दर लिटरमागे १६ रुपयांनी वाढले आहे. माल वाहतूक भाड्यातील सर्वांत जास्त खर्च डिझेलमध्येच जात आहे. कंपन्या भाडेवाढ करण्यास तयार नाही, यामुळे मालवाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे, अशीच परिस्थिती राहिली तर मालवाहतूक व्यवसाय बंद पडेल, अशी भीती औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेने केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. देशातील माल वाहतूक व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी मालवाहतूकदारांनी मालट्रक खरेदीसाठी काढलेले कर्ज संपूर्णपणे माफ करण्यात यावे, डिझेलचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
बहुतांश मालवाहतूकदारांनी कंपन्यांशी करार केले आहेत. डिझेलचे भाव लिटरमागे १६ रुपयांनी वाढले तरी कंपन्या मागील वर्षीच्या जुन्या करारानुसारच गाडी भाडे देत आहे, त्यात टोलनाकाचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे व्यावसायिकांना तोटा सहन करून कंपन्यांचा करार पूर्ण करावा लागत आहे.
केंद्र सरकारने ट्रकमालकांना ३१ मार्चपर्यंत गाडीचे कागदपत्रे नूतनीकरण करण्यास वेळ दिली आहे. परिवहन विभागात गाडीचे नूतनीकरण करण्यासाठी ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च येतो. आधीच मागील वर्षी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊनमुळे मालवाहतूक बंद होती, त्याचा मोठा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे महासचिव जयकुमार थानवी यांचीही स्वाक्षरी आहे.