अस्तित्वात नसलेल्या महिलेच्या नावे कर्ज !
By Admin | Updated: December 10, 2014 00:40 IST2014-12-10T00:35:43+5:302014-12-10T00:40:49+5:30
लातूर : भटक्या विमुक्त जाती-जमातीतील व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने वसंतराव नाईक महामंडळाची स्थापना केली.

अस्तित्वात नसलेल्या महिलेच्या नावे कर्ज !
लातूर : भटक्या विमुक्त जाती-जमातीतील व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने वसंतराव नाईक महामंडळाची स्थापना केली. मात्र या महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने अस्तित्वात नसलेल्या महिलेच्या नावे कर्ज देऊन अजब प्रकार केला आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या महिलेला कर्जफेडीची नोटीसही व्यवस्थापकाने पाठविली आहे.
भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी २५ हजारांपासून ५ लाखांपर्यंत वसंतराव नाईक महामंडळाच्या वतीने कर्ज दिले जाते. नाममात्र व्याजदरात भटक्या विमुक्तांसाठी राज्य शासनाने ही सोय केली आहे. वैयक्तिक व छोट्या-मोठ्या लघु उद्योगांसाठी महामंडळामार्फतही कर्ज योजना राबविण्यात येते. मात्र लातूरच्या स्थानिक प्रशासनाकडून सावळा गोंधळ समोर आला आहे. लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) या गावात अस्तित्वात नसलेल्या श्रीदेवी शिवाजी सुरवसे या महिलेच्या नावाने ६ डिसेंबर २००८ रोजी २५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. सलगरा (बु.) येथे श्रीदेवी शिवाजी सुरवसे नावाची महिलाच नाही. तरीही महामंडळाने कर्ज दिले आहे. विशेष म्हणजे या पत्त्यावर त्या महिलेच्या नावे कर्ज परतफेड केली नाही, म्हणून ६ आॅगस्ट २०१४ रोजी नोटीस पाठविली आहे. आठ दिवसांच्या आत कर्जभरणा करावा अन्यथा आपली मालमत्ता जप्त केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे. या नावाची महिला गावात नसताना अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. महामंडळाच्या लातूर कार्यालयाने अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात बोगस कर्ज वाटप केल्याची चर्चा आहे. ४० ते ५० कर्ज प्रकरणातील नोटिसा यामुळेच परत आल्या असाव्यात, असे बोलले जाते.
सलगरा (बु.) ग्रामपंचायतीने श्रीदेवी शिवाजी सुरवसे या नावाची महिला आमच्या गावात नाही. मागेही नव्हती, असे प्रमाणपत्रच दिले आहे. त्यामुळे सदरचे कर्ज प्रकरण बोगस असल्याचे वाटत असून, यापूर्वी अशाच कर्ज प्रकरणात तत्कालीन एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महामंडळाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. (प्रतिनिधी)४
सलगरा (बु.) ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा दगडू माने यांनी ग्रामपंचायतीची मासिक बैठक घेऊन आपल्या गावात श्रीदेवी शिवाजी सुरवसे नावाची महिला आहे का, याची खातरजमा केली. गावात घरोघरी भेटी देऊन संबंधित नावाची महिला आहे का? याची पाहणी केली. मात्र गावात श्रीदेवी शिवाजी सुरवसे नावाची महिला नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे या ग्रामपंचायतीने तसा पंचनामा करून आमच्या गावात या नावाची महिला नसल्याचे सरपंच पुष्पा माने व ग्रामसेवक पी.आर. सय्यद यांच्या स्वाक्षरीने पत्र देऊन सांगितले आहे. घरभेटी व मासिक बैठक घेऊन तपास केल्याचे पत्रात म्हटले आहे.४
वसंतराव नाईक महामंडळातून अनेक लाभार्थ्यांनी कर्ज घेतले आहेत. लाभार्थी संख्या मोठी असल्यामुळे नजरचुकीने सलगरा (बु.) येथे श्रीदेवी शिवाजी सुरवसे यांच्या नावे नोटीस गेली असावी.
४कदाचित् या महिला दुसऱ्या कोणत्या गावातील लाभार्थी असतील. बोगस कर्ज वाटप महामंडळातून झाले नाही, असे प्रादेशिक व्यवस्थापक जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.