कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: January 15, 2017 01:10 IST2017-01-15T01:09:40+5:302017-01-15T01:10:46+5:30
लातूर : चाकूर तालुक्यातील वाघोली येथे ऐन मकर संक्रांतीदिवशीच कर्जबाजारी शेतकरी सूर्यकांत भोसले (५७) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर : चाकूर तालुक्यातील वाघोली येथे ऐन मकर संक्रांतीदिवशीच कर्जबाजारी शेतकरी सूर्यकांत निवृत्ती भोसले (५७) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चाकूर तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी सूर्यकांत निवृत्ती भोसले (५७) यांना दोन एकर शेती आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. यातूनच ते पत्नीला मकर संक्रांतीनिमित्त सुगडे आणतो असे सांगून घराबाहेर पडले. दरम्यान, बराच वेळ झाला तरी पती घराकडे कसे काय येत नाहीत? म्हणून पत्नी शेताकडे गेली. यावेळी सूर्यकांत भोसले यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस पाटील रामराव भगवानराव केंद्रे यांच्या खबरीवरुन चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सूर्यकांत पवार यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.