अकराशे कोटींची मिळणार कर्जमाफी
By Admin | Updated: July 3, 2017 00:14 IST2017-07-03T00:10:56+5:302017-07-03T00:14:01+5:30
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.

अकराशे कोटींची मिळणार कर्जमाफी
मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.
जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षांत जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस झाला. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. तसेच २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात काही भागात अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या चार वर्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला. २०१५-१६ या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठीही पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीही मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांनी बँकांकडून जवळपास १६३४ कोटींचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले.
या कर्जाच्या रक्कमेतून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खत, बियाणे विकत घेऊन पेरणी केली. त्यानंतर २०१६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. परंतु, मालाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हा माल कवडीमोल दराने खरेदी केला. त्यामुळे उत्पन्न होऊनही शेतकरी कर्जबाजारीच राहिला. परिणामी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची फेड शेतकऱ्यांकडून झाली नाही. कर्जाचा डोंगर वाढत राहिला. जिल्ह्यातील शेतकरी बँकाचे थकबाकीदार झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आत्महत्येसारखे शेवटेच पाऊल उचलू लागला.
शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफीची करण्याची घोषणा शासनाने केली. २८ जून २०१७ रोजी तसा आदेशही काढला. या आदेशानुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना काही निकषाच्या आधीन राहून दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बँकांचे ३० जून २०१६ पर्यंतचे थकित असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेअंतर्गत माफ होणार आहे.
जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४० हजार शेतकऱ्यांचे जवळपास ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.