जमावाच्या मारहाणीत जखमी असलेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 13:32 IST2017-07-14T13:31:39+5:302017-07-14T13:32:54+5:30
प्रशांत नगर येथील गोडाऊनमध्ये भंगार चोरीच्या संशयावरून मारहाण झालेल्या विजय पांडुरंग सदाफुले या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू.

जमावाच्या मारहाणीत जखमी असलेल्या युवकाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद: प्रशांत नगर येथील गोडाऊनमध्ये भंगार चोरीच्या संशयावरून मारहाण झालेल्या विजय पांडुरंग सदाफुले (वय ३६ रा . छोटा मुरलीधरनगर ) या तरुणाचा उपचारा दरम्यान आज पहाटे मृत्यू झाला.
या बाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी ( दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास अनिल गायकवाड, विनोद बत्तासे आणि विजय सदाफुले हे प्रशांतनगर येथील संदीप जोशी यांच्या केटरिंग च्या गोडाऊन मध्ये घुसल्या चे वाचमन च्या लक्षात आले . यावेळी त्याने आरडाओरडा करताच मोठा जमाव जमला. यावेळी तेथून पळून जात असताना अनिल आणि विजय जमावाच्या हाती लागले तर विनोद पळून जाण्यात यशस्वी झाला.
यावेळी जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत अनिल आणि विजय गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच जमावाने त्यांना उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नेले. यानंतर पोलीसांनी जखमी विजय आणि अनिल यांना घाटी रुग्णालयात दाखल केलें . डॉक्टरांनी यावेळी अनिलला काही वेळाने डिस्चार्ज दिला. परंतु; गंभीर जखमी असलेल्या विजयला आयसीयु मध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असतांना विजयचा आज पहाटे मृत्यू झाला.
मयत विजयच्या पत्नीच्या तक्रारीवरुन अनोळखी लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा उस्मानपुरा ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड आणि पोलीस निरीक्षक सतिश टाक यांनी दिली.
आरोपीच्या अटकेची मागणी
विजय याचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यानी घाटीत धाव घेतली . यावेळी आरोपीना अटक करा. मयताच्या नातेवाईक याना नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली.
आरोपी पसार
विजयचा मृत्यू झाल्याचे कळताच मारहाण करणारे संशयित पसार झाल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. घाटीत जमाव जमताच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, ऱाहुल चव्हाण आणि कर्मचारी यांनी बंदोबस्त वाढ केली.