प्रसूतीसाठी आलेल्या गंगापूरच्या महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:10 IST2017-09-04T00:10:16+5:302017-09-04T00:10:16+5:30
गंगापूर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तब्येत खालावल्याने घाटीत दाखल केलेल्या एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला.

प्रसूतीसाठी आलेल्या गंगापूरच्या महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : गंगापूर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तब्येत खालावल्याने घाटीत दाखल केलेल्या एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. प्रसूतीच्या वेळी अतिरक्तस्राव झाल्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूस जबाबदार असणाºया डॉक्टरवर कारवाई करा, या मागणीसाठी या महिलेच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
शालिनी दत्तात्रय कट्टे (३२, रा. आंबेवाडी, गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मागील पाच दिवसांपासून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. गेल्या पाच दिवसांत उपचारादरम्यान तब्बल ६० रक्ताच्या पिशव्या लागल्या. गंगापूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये २७ आॅगस्टला त्यांची प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना २८ आॅगस्टला घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सहाव्या दिवशी शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घाटी पोलीस चौकीत एमएलसी करण्यात आली आहे. गंगापूर येथील रुग्णालयात प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.जोपर्यंत मृत्यूस कारणीभूत असलेल्या गंगापुरातील डॉक्टरला अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला होता. गंगापूरचे पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, स.पो.नि. इंगळे यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांची भेट घेऊन झाल्याप्रकाराची माहिती घेतली. दरम्यान, आज गंगापूर येथील डॉ. पानकडे यांच्या श्रीकृष्ण रुग्णालयात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रविवारी सायंकाळी शालिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगापूर शहरातील खाजगी दवाखान्यात हलगर्जीपणाचे प्रमाण वाढले असून केवळ पैशासाठी रुग्णांची लूट करण्याचा धंदा डॉक्टरांनी सुरु केला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला. वरिष्ठ अधिकाºयांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांकडून होत आहे.