घाटीच्या दारातच मरणयातना

By Admin | Updated: January 3, 2015 00:17 IST2015-01-03T00:10:05+5:302015-01-03T00:17:24+5:30

औरंगाबाद : घाटीच्या दरवाजात पाच निराधार गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरक्ष: मरणयातना भोगत आहेत.

Death Valley | घाटीच्या दारातच मरणयातना

घाटीच्या दारातच मरणयातना

औरंगाबाद : दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडलेले अनेक जण मरणाच्या दारातून परत येण्यासाठी घाटीच्या दारात येतात अन् बरे होऊन घरीही जातात; परंतु याच घाटीच्या दरवाजात पाच निराधार गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरक्ष: मरणयातना भोगत आहेत. आवारातून आत नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची तसदीही घाटी प्रशासन किंवा या रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या तथाकथित समाजसेवकांनी घेतलेली नाही.
याच उदासीनतेमुळे बुधवारी अशाच एका निराधार वृद्धाचा उपचाराअभावी घाटीच्या दरवाजात तडफडून मृत्यू झाला व त्याच्या मृतदेहाला अक्षरक्ष: मुंग्या लागल्या...
घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच शासकीय दंत महाविद्यालय आणि बाह्यरुग्ण विभागासमोर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चार अनोळखी व्यक्ती बेवारस अवस्थेत बसलेल्या दिसतात. यात दोन महिलांचाही समावेश आहे, तर अन्य एक जण अपघात विभागासमोरील समतादर्शन धर्मशाळेच्या पायऱ्यावर पायाला कपड्याने बांधून बसलेला असतो.
दंत महाविद्यालयासमोरील शेडमध्ये एक मध्यम वयाचा व्यक्ती मळक्या कपड्यात बसलेला आहे. त्याच्या दोन्ही पायाची बोटे अपघातात कापल्या गेली. त्यामुळे त्यास चालताही येत नाही. घटनेनंतर कोणीतरी त्याला घाटी परिसरात आणून टाकले. तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजले. मात्र, तो पूर्ण नाव आणि अचूक पत्ता सांगत नाही. अनेक दिवसांपासून तो एकाच ठिकाणी बसलेला आहे. त्याच्या शेजारी काही अंतरावर एक महिला झोपलेली असते. सडपातळ बांधा असलेली वयाची चाळिशी ओलांडलेली ही महिला जालना येथील रहिवासी आहे. दोन- चार महिन्यांपासून ती अंगावर मळका शर्ट आणि लेडीज पायजामा घालून वावरताना दिसते. सोबत मोठे गाठोडे घेऊन ती शेडखाली बसलेली असते. त्याचप्रमाणे अन्य दोन व्यक्ती त्याच शेडखाली झोपलेल्या असतात. त्या कधीही जागेवरून हालत नाहीत. अपघात विभागासमोर अनेक दिवसांपासून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला मोठी जखम झालेली आहे. या जखमेतून सतत द्रव वाहत असतो. त्यास नीट चालताही येत नाही. त्यामुळे तो रांगतच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो. सुमारे महिनाभरापासून तो अपघात विभागाशेजारी बसलेला असतो. या बेवारस अनोळखी व्यक्ती कोणालाही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. दोन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या बेवारस व्यक्तीप्रमाणे या अनोळखी व्यक्तीही उपचाराअभावी मृत्युमुखी पडू शकतात.

Web Title: Death Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.