‘त्या’ चिमुकलीचा मृत्यू कुपोषणामुळेच!
By Admin | Updated: April 21, 2016 00:03 IST2016-04-21T00:03:39+5:302016-04-21T00:03:39+5:30
औरंगाबाद : स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानचे दाम्पत्य आपल्या ज्या चिमुकलीला समोर करीत होते, त्या चिमुकलीचाच अन्नाविना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

‘त्या’ चिमुकलीचा मृत्यू कुपोषणामुळेच!
औरंगाबाद : स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानचे दाम्पत्य आपल्या ज्या चिमुकलीला समोर करीत होते, त्या चिमुकलीचाच अन्नाविना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आधीच अन्न नाही, त्यात आजारी पडल्याने या मुलीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज शवविच्छेदनानंतर समोर आल्याचे घाटीतील सूत्रांनी सांगितले. नेमके मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तिचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला असल्याचे पोलीस म्हणाले.
मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास
( पान १ वरून ) सुरशी बागरी (रा. राजस्थान) ही महिला पदराखाली आपल्या तीनवर्षीय आमरी या चिमुकलीला ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिग्नलजवळ भीक मागत होती. तिची इतर मुले रस्त्याच्या कडेला बेवारस रडत आढळून आल्याने पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाने मुलांकडे विचारपूस केली. नंतर तेथे सुरशी व तिचा पती राजूलाल यांना बोलावण्यात आले. तेव्हा सुरशीच्या पदराखाली असलेली आमरी ही चक्क मेलेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलीचे प्रेत घेऊन सुरशी भीक मागत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे सुरशीचा दीर राकेश हा लंगडा नसतानाही तो कुबड्या घेऊन अपंग असल्याचे भासवत भीक मागत असल्याचेही यावेळी उघड झाले होते. या सर्वांना दामिनी पथकाने ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. ‘त्या’ चिमुकलीचे प्रेत घाटीत ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. त्यात या चिमुकलीच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचे आढळून आले आहे. अन्नाअभावी कुपोषण आणि त्यातच आजारपण या मुळे आमरीचा मृत्यू झाल्याचे घाटीतील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यावरून ज्या चिमुकलीचे भांडवल करीत हे राजस्थानी दाम्पत्य भीक मागून स्वत:च्या पोटाची खळगी भरत होते, ती चिमुकली स्वत: मात्र अन्नाच्या कणाकणासाठी महाग झालेली होती, हे स्पष्ट दिसून येते.
३६ तास अगोदरच मृत्यू
आमरीचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. त्यात तिचा मृत्यू शवविच्छेदनाच्या ३६ तास अगोदर झालेला आहे, असा प्राथमिक अहवाल घाटीतील डॉक्टरांनी पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हणजेच मंगळवारी सकाळी-सकाळी तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पावणे बारापर्यंत म्हणजेच पोलिसांनी पकडेपर्यंत तिचे भांडवल करीत हे दाम्पत्य भीक मागत होते, हे स्पष्ट झाले आहे.
सुरशी व तिचा पती तीनवर्षीय चिमुकलीला पदराखाली दडवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागत होते, हे खुद्द दामिनी पथकाने पाहिले. नंतर याच पथकाने मुलीचे प्रेत आणि त्याचा आधार घेत भीक मागणाऱ्या सुरशी, तिचा पती, दीर आणि जाऊला बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे ही सर्व हकीकत व घटनाक्रम दामिनी पथकाने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बोलतानाही सांगितला. आजही दामिनी पथकाने तशीच हकीकत माध्यमांसमोर सांगितली. आता मात्र पोलिसांनी (दामिनी पथकाने नव्हे) ‘यू-टर्न’ घेतला. हे दाम्पत्य भीक मागत नव्हते. सुरशी आपल्या या आजारी चिमुकलीला घेऊन एका कोपऱ्यात बसली होती. हे दाम्पत्य भिकारी नाही, तर रस्त्यावर खेळणी विकणारे आहे असे पोलीस अधिकारी सांगत आहेत. पोलिसांचा हा ‘यू-टर्न’ आश्चर्यकारकच आहे. कारण शवविच्छेदनात त्या चिमुकलीचा मृत्यू दामिनी पथकाने प्रकार उघडकीस आणण्याच्या कित्येक तास आधी झाल्याचे समोर आले. आपल्या आजारी मुलीने प्राण सोडलेला असल्याचे आईला कित्येक तास समजत नाही, केवळ अशक्यच आहे. शिवाय या टोळीतील एक जण भीक मागण्यासाठी अपंग नसताना कुबड्या घेऊन फिरतो, तरीही आता पोलिसांना त्यांच्यात संशयास्पद काहीच का वाटत नाही, हाच खरा प्रश्न आहे.