वाहनांमध्ये मृत्यूचे सापळे...
By Admin | Updated: December 16, 2014 01:04 IST2014-12-16T00:40:39+5:302014-12-16T01:04:53+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही धोकादायरित्या पत्रे, सळयांसह इतर वस्तूंची राजरोस वाहतूक सुरू आहे़

वाहनांमध्ये मृत्यूचे सापळे...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही धोकादायरित्या पत्रे, सळयांसह इतर वस्तूंची राजरोस वाहतूक सुरू आहे़ धोकादायक वाहतुकीमुळे सोनारी (ता़परंडा) येथील युवक दत्तात्रय गाढवे (वय-२६) याचा शनिवारी मृत्यू झाला आहे़ यापूर्वी अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत़ मात्र, तरीही धोकादायकरित्या वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकडे पोलिस प्रशासनासह उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केले आहे़
उस्मानाबाद : सोमवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गासह इतरही वर्दळीच्या रस्त्यांवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी राजरोसपणे वाहनांमधून धोकादायक वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. वाहतूक शाखा व परिवहन विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजरोसपणे सुरू असलेली ही वाहतूक पाहता कारवाईचा केवळ फार्स असल्याचे दिसते.
शहरातील शिवाजी चौक, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिजाऊ चौक, नेहरू चौक, ख्वॉजानगरसह विविध ठिकाणच्या वर्दळीच्या ठिकाणाहून धोकादायकरित्या वस्तूंची वाहतूक करण्यात येते़ ट्रॅक्टर, मालवाहतूक टमटममधून सळया, पत्रे, लाकडी आडू आदीसह इतर साहित्याची वाहतूक मोठ्या जोमात सुरू आहे़ उस्मानाबाद शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी सकाळी एका टमटममध्ये धोकादायरित्या शेतातील पाईप भरल्याचे दिसून आले़ तेथूनच पुढे जिजाऊ चौकाकडे एका मालवाहतूक टमटममधून चार ते पाच फूट बाहेर असलेल्या सळया नेण्यात येत होत्या़ ख्वॉजा नगर भागातील एका गॅरेजजवळ थांबलेल्या टमटमममध्येही धोकादायरित्या तारा बांधण्यात आल्या होत्या़ मात्र, या टमटमच्या चालकाने धोकादायक स्थिती असल्याचे ओळखू यावे, यासाठी लाल कापड लावले होते़ बायपास मार्गावरील एका गॅरेजवरही लाकडाने भरलेला टेम्पो थांबला होता़ आतील लाकडे बाहेर पडू नयेत, यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली नव्हती. तेथून पुढे सांजा मार्गावरील एका शाळेजवळ थांबलेल्या ट्रॅक्टच्या ट्रॉलीत दगडे भरलेली होती़ मात्र, पाठीमागील फाळका लावलेला नव्हता़ शहरातील काही मार्गावरील ही अशी अवस्था कायम दिसून येते़ ग्रामीण भागातही धोकादायरित्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत रेलचेल असते़ (प्रतिनिधी)४
वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग याबाबतीत कारवाई सुरू असल्याचे सांगत आहे़ या दोन्ही विभागांनी कारवाईचा बडगा काटेकोरपणे उगारला असता तर ही धोकादायक वस्तूंची वाहतूक सुरू राहिली असती का ? हाच खरा प्रश्न आहे़ दोन्ही विभागांच्या म्हणण्यानुसार कारवाई सुरू आहे़ कारवाई सुरू असली तरी धोकादायकरित्या वस्तूंची वाहतुकही जोमातच सुरू असल्याचे दिसते.
कारवाई सुरू आहे
४शहरात धोकादायक रित्या सळया, पत्रे आदी वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टमटमवर कारवाई करण्यात येत आहे़ याबाबत संबंधित व्यवसायिकांनाही लेखी पत्र देण्यात येणार असून, ही कारवाई सातत्याने होत राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोनि शेख यांनी सांगितले़
साहित्य बाहेर ठेवता येणार नाही
४यापूर्वीच्या नियमांमध्ये वाहनाच्या लांबीपेक्षा एक मीटर साहित्य बाहेर ठेवण्याची मुभा होती़ मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या परिपत्रकात आता एक फूटही साहित्य बाहेर ठेवता येणार नाही़ त्याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली आहे़ काही दिवसांपूर्वी वीज कंपनीचे पोल बाहेर ठेवून नेणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे़ परिवहन विभाग यापुढेही धोकादायकरित्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़