मेल्ट्रोनमध्ये उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:06 IST2021-04-22T04:06:11+5:302021-04-22T04:06:11+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी एका रुग्णाचा उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर ...

मेल्ट्रोनमध्ये उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू
औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी एका रुग्णाचा उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात असून, घाटी रुग्णालयात नेताना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ३५० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ३०० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांसाठी येथे ऑक्सिजनची व्यवस्था आहे. पण गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयात रेफर केले जाते. मंगळवारी सकाळी एका रुग्णाची प्रकृती गंभीर बनली. ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याची गरज होती. परंतु मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन त्याप्रमाणात देण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णाचा काही मिनिटांतच मृत्यू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एका रुग्णाची काल प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात पाठविले जात होते. रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांनीही, मेल्ट्रॉनमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला. मागील काही दिवसांमध्ये मेल्ट्रॅान हॉस्पिटलमधून घाटीत किती रुग्णांना पाठविण्यात आले, त्यातील किती रुग्ण मरण पावले याचा तपशील मनपाच्या आरोग्य विभागाने दिला नाही.
----------
रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण मेला तरी चालेल...
मेल्ट्रॉनमध्ये रुग्ण गंभीर बनल्यानंतर त्यास घाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचे प्रकार वाढले आहेत. इतर ठिकाणी हलविताना अनेक रुग्ण घाबरत आहेत. मात्र मेल्ट्रॉनमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण मेला तरी चालेल, असे फर्मान येथील डॉक्टरांना प्रशासनाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.