औरंगाबाद येथे जखमी गर्भवतीचा मृत्यू, चार जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:03 IST2018-02-13T00:03:46+5:302018-02-13T00:03:54+5:30
दहा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मारहाणीत जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान ११ फेबु्रवारी रोजी रात्री अडीच वाजता मृत्यू झाला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पैठणगेट येथे झाली. याप्रकरणी घराशेजारी राहणाºया चार जणांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला.

औरंगाबाद येथे जखमी गर्भवतीचा मृत्यू, चार जणांविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दहा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मारहाणीत जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान ११ फेबु्रवारी रोजी रात्री अडीच वाजता मृत्यू झाला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पैठणगेट येथे झाली. याप्रकरणी घराशेजारी राहणाºया चार जणांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला.
मंजूषा अजय कदम (३१, रा. पैठणगेट) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मानव दीपक कदम, सचिन सातपुते, गोट्या क ांबळे, आदित्य उबाळे यांचा आरोपींत समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गल्लीत हळदीचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी मानव कदम, त्याचे साथीदार सातपुते, गोट्या कांबळे, आदित्य उबाळे यांनी मंजूषा यांचा पुतण्या शेखर कदम याला मारहाण केली होती. यावेळी शेखरचे काका राजेश कदम हे घराबाहेर आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शेखरच्या काकू सविता व मंजूषा यांनाही मारहाण करण्यात आली. दोन महिन्यांच्या गर्भवती मंजूषा यांच्या पोटात लाथा आणि बुक्के मारण्यात आल्याने त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना लगेच खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तेथे मंजूषा यांची प्रकृती तपासून डॉक्टरांनी त्यांचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. नंतर मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घाटीतील डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचार सुरू असताना रविवारी रात्री मंजूषा यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शेखर कदम यांनी फिर्याद नोंदविली आहे.
५ रोजी दिला होता अर्ज
शेखर कदम याने या घटनेनंतर क्रांतीचौक पोलिसांना ५ फेबु्रवारी रोजी आरोपींविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जात त्याने मानव कदम याने केलेल्या मारहाणीमुळेच मंजूषा यांचा गर्भपात झाल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी मात्र आठ दिवस चौकशीत खर्च केले. दरम्यान, मंजूषा यांचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला.