न्यायालयीन कोठडीतील महिलेच्या मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: July 24, 2014 00:12 IST2014-07-24T00:02:37+5:302014-07-24T00:12:02+5:30
उस्मानाबाद : मुरूम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका महिलेच्या दोन महिन्याच्या मुलीचा जिल्हा रूग्णालयात उपचादरम्यान मृत्यू झाला़

न्यायालयीन कोठडीतील महिलेच्या मुलीचा मृत्यू
उस्मानाबाद : मुरूम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका महिलेच्या दोन महिन्याच्या मुलीचा जिल्हा रूग्णालयात उपचादरम्यान मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी सांगितले की, शेतातील बांधाच्या कारणावरून येणेगूर (ता़उमरगा) येथे शनिवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली होती़ या हाणामारी प्रकरणी रविवारी मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणात अटकेतील शीतल सिध्देश्वर हिप्परगे यांना उमरगा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती़ शितल हिप्परगे यांच्यासोबत अडीच वर्षाची समृध्दी व दोन महिन्याची समीक्षा या दोन मुली लहान असल्याने उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात आणण्यात आल्या होत्या़ मंगळवारी दुपारी जिल्हा कारागृहातील समीक्षा या दोन महिन्याच्या मुलीची प्रकृती बिघडली होती़ त्यामुळे तिस दुपारी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत मुलीचे वजनही कमी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ याबाबत डॉ़ एस़पी़पाटील यांच्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)