शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: March 20, 2016 00:47 IST2016-03-20T00:35:30+5:302016-03-20T00:47:23+5:30
वाशी : कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर तीच गंज पडल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला़

शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
वाशी : कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर तीच गंज पडल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सेलू (ता़वाशी) येथे घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील सेलू येथील संतोष रामचंद्र आडसूळ (वय-३७) हा युवक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शेतात झोपायला गेला होता़ तो झोपला असता अचानक आगीच्या झळयांमुळे त्याला जाग आली़ त्यावेळी त्याच्या शेतातील कडब्याच्या गंजीला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले़ आगेचे लोळ पाहता परिसरातील अनेक नागरिकही त्या ठिकाणी जमले़ मात्र, लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संतोष आडसूळ याच्या अंगावरच पेटलेली गंज पडली़ या आगीत संतोष आडसूळ याचा जागीच होरपळून मृत्यू झाला़ याबाबत नरसिंग आडसूळ यांनी दिलेल्या माहितीवरून वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
दरम्यान, एकीकडे सेलू व परिसरात पाणी- चारा टंचाई निर्माण झालेली असताना त्यात एका शेतकऱ्याचा पेटलेल्या कडब्याची गंज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)