वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: August 11, 2014 00:03 IST2014-08-10T23:58:45+5:302014-08-11T00:03:57+5:30
शुक्रवारी सायंकाळी खड्ड्यात उतरलेल्या एका मुलाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मुलाचा मृत्यू
मठपिंपळगाव: अंबड तालुक्यातील नागझरी येथील दुधना नदीपात्रात मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठ मोठाले खड्डे झालेले आहेत. शुक्रवारी सायंकाळी खड्ड्यात उतरलेल्या एका मुलाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करीत असल्याने नदीपात्र धोकादायक होत आहे.
नागझरी येथील शेख सादीक शेख तय्यब हा मुलगा शुक्रवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नदीपात्रात शौचालयास गेला होता. शौचालयास बसल्यानंतर वाळूमातीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळल्याने तो मरण पावला. त्यास ग्रामस्थांनी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यान त्याचा त्याच्यावर त्याच दिवशी रात्री दफनविधी करण्यात आला. दुसऱ्यादिवशी तलाठी जे. एल. खरजूले यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृताच्या नातेवाईकांनी तक्रार किंवा कोणावर संशय निर्माण केला नसल्याचे पंचनाम्यात नमुद केले. (वार्ताहर)