इराणमधील वादळात औरंगाबादच्या तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: March 19, 2016 01:08 IST2016-03-19T01:01:28+5:302016-03-19T01:08:34+5:30
औरंगाबाद : इराणमधील ‘लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट’या कंपनीत कर्मचारी असलेल्या औरंगाबादच्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

इराणमधील वादळात औरंगाबादच्या तरुणाचा मृत्यू
औरंगाबाद : इराणमधील ‘लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट’या कंपनीत कर्मचारी असलेल्या औरंगाबादच्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. १५ मार्च रोजी रात्री १.३० वा. (भारतीय वेळेनुसार) जहाज वादळात सापडून झालेल्या या दुर्घटनेत पलाश दत्तात्रय बलशेटवार (रा.सुमंगल विहार, मोरेश्वर हाऊसिंग सोसायटीजवळ, गारखेडा) याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
इराणच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क करून याप्रकरणी माहिती संकलित केली जात आहे. पलाशच्या मृत्यू वार्तेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दत्तात्रय यांना पलाश हा एकुलता एक मुलगा होता. पलाशच्या मृत्यूची वार्ता येताच गारखेडा परिसरातील सुमंगल विहारात शोककळा पसरली. पलाश काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका एजन्सीमार्फत इराणच्या मर्चंट नेव्हीमध्ये कामाला गेला होता. तो लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट या कंपनीच्या जहाजावर कार्यरत होता. त्याच्यासोबत आणखी सहा भारतीय तरुण त्या जहाजावर कामाला होते. १५ मार्च रोजी झालेल्या घटनेत पलाशसह असलेल्या सात भारतीय तरुणांपैकी एक जण जखमी आहे. उर्वरित पाच जणांना किरकोळ इजा झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. शहरात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पलाश बलशेटवार याने मुंबईतील सिरँक कन्सलटन्सीमध्ये नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. त्याच कंपनीच्या माध्यमातून त्याला इराणच्या लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट येथे नेव्हीत नोकरी मिळाली होती. २४ डिसेंबर २०१५ रोजी तो इराणला रवाना झाला होता.
१५ मार्च रोजी रात्री पलाशच्या नातेवाईकाच्या मोबाईलवर तो मृत्युमुखी पडल्याचा मॅसेज मॅसेंजरवरून येऊन धडकला. पलाशचे वडील दत्तात्रय यांनी इराणच्या भारतीय राजदूतांशी संपर्क साधला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी माजी नगरसेवक सुशील खेडकर यांना संपर्क केला. त्यानंतर खा.चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क केला. दिल्लीतून इराणच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क केल्यानंतर समजले की, पलाश ज्या भागामध्ये काम करतो, त्या ठिकाणी काही दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे त्याचा मृतदेह भारतात येण्यास विलंब होईल.