प्रिमॅच्युअर डिलिव्हरीमुळे २५८ बाळांचा मृत्यू
By Admin | Updated: April 8, 2015 00:53 IST2015-04-08T00:42:21+5:302015-04-08T00:53:58+5:30
भालचंद्र येडवे ,लातूर हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, जंतू प्रसार, सकस आहार व उपचाराचा अभाव तसेच रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे़

प्रिमॅच्युअर डिलिव्हरीमुळे २५८ बाळांचा मृत्यू
भालचंद्र येडवे ,लातूर
हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, जंतू प्रसार, सकस आहार व उपचाराचा अभाव तसेच रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे़ परिणामी वर्षभरात २५८ बाळांचा मृत्यू झाला़ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कागदोपत्री जनजागृती केली जाते़ प्रत्यक्षात ग्रामीण गरोदर मातांना सकस आहार व उपचाराच्या टिप्स मिळत नाहीत़ त्यामुळेच गरोदर मातांची डिलिव्हरी कालावधीपूर्वी झाल्याचे प्रमाण अधिक आहे़ केवळ सकस आहार व योग्य उपचार न मिळाल्यामुळे हे संकट ओढावले आहे़ एकट्या लातूर जिल्ह्यात आईच्या पोटात गुदमरुन १६, कमी वजनामुळे ३९ बालकांचा मृत्यू झाला आहे़ परिणामी, ‘सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्रा’चा एक प्रकारे फज्जाच उडाला आहे़
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात निमोनिया, कमी दिवस व कमी वजन, हृदयास छिद्र, गुदमरणे, मेंदूज्वरसह अन्य विविध कारणांनी वर्षभरात २५८ बाळांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे़ त्यात एकट्या लातूर तालुक्यात उपरोक्त कारणांन्वये ५० बालमृत्यू झाले आहेत़ त्यात २१ मुले तर २९ मुलींचा समावेश आहे़ बाळांचे वजन कमी असल्या कारणाने मृत्यू झाल्याचा आकडा मोठ्या प्रमाणात आढळतो़ प्रिमॅच्युरीटी व बाळाची वाढ न होणे या दोन प्रकारामुळे आरोग्यावर परिणाम होतो़ गरोदर मातांना ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार, रक्त कमी असणे, जंतू प्रसार, सकस आहार, वेळेवर उपचार आदी कारणांमुळे बालमृत्यूच्या संकटाला सामोरे जावे लागते़ आजही ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या प्रबोधनाभावी प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण अधिक आहे़ या सर्व गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी सरकार राजीव गांधी जीवनदायी योजनेसह अनेक उपक्रम राबवितात़ मात्र शासकीय रुग्णालयात नवजात अर्भक अतिदक्षता विभागात (एनआयसीयु) योग्य उपचार व सुविधा उपलब्ध न झाल्याने प्रतिदिनी ८ ते १० रुग्ण सेवा न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतात़ लातूर जिल्ह्यात पहिल्या आठवड्यातच ८० बाळांना वेगवेगळ्या कारणाने आपला जीव गमवावा लागला़ तर १ ते ५ वर्षातील बाळांच्या मृत्यूचे प्रमाण २५८ च्या घरात आहे़ या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीत चिंता व्यक्त करुन संबंधीतांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सुचविले आहे़ गरोदर मातांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या़