डीन, मेट्रन, वैद्यकीय अधीक्षकांचे बंगले पडले ओस
By Admin | Updated: September 1, 2014 00:46 IST2014-09-01T00:34:02+5:302014-09-01T00:46:29+5:30
औरंगाबाद : अधिष्ठाता (डीन), वैद्यकीय अधीक्षक, मेट्रन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) कॅम्पसमध्ये राहणे बंधनकारक आहे,

डीन, मेट्रन, वैद्यकीय अधीक्षकांचे बंगले पडले ओस
औरंगाबाद : अधिष्ठाता (डीन), वैद्यकीय अधीक्षक, मेट्रन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) कॅम्पसमध्ये राहणे बंधनकारक आहे, त्याबाबतचे शासन परिपत्रकसुद्धा आहे. मात्र, दहा वर्षांपासून घाटीच्या कॅ म्पसमध्ये या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्यांत कोणीही राहत नसल्याने त्याचे रूपांतर भूत बंगल्यात झाले आहे.
घाटीमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा हे दोन्ही कार्य रात्रंदिवस सुरू असते. दोन्ही बाबी एकमेकांशी पूरक आहेत. घाटीत एमबीबीएसचे सुमारे ५५० आणि एम. डी., एम. एस. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे २४० विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी घाटीच्या परिसरातच राहतात.
घाटीच्या आंतररुग्ण विभागातील विविध वॉर्डात बाराशेहून अधिक रुग्ण दाखल असतात. बाह्यरुग्ण विभागात रोज १८०० रुग्ण येतात. अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ४०० हून अधिक असते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अधिष्ठाता, रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग इन्चार्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र बंगले आणि निवासस्थाने बांधलेली आहेत. एवढेच नव्हे तर वैद्यकीय शिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ, टेक्निशियन आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची निवासस्थानेही या परिसरात आहेत. या सर्वांनी या निवासस्थानात राहणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.
गेल्या काही वर्षांपासून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याची रक्कम वाढल्याने बहुतेक अधिकाऱ्यांनी शहरात स्वत:ची घरे बांधली आहेत. शिवाय गृहकर्ज घेतल्याने त्यांना आयकरातही सवलत मिळते. परिणामी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, मेट्रन, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापकांनी घाटीतील आपल्या निवासस्थानाकडे पाठ फिरविली आहे.
निमाले ठरले शेवटचे अधिष्ठाता
अधिष्ठातांच्या बंगल्यात दहा वर्षांपासून कोणीही राहत नाही. त्यामुळे या बंगल्यात राहणारे डॉ. निमाले हे शेवटचे अधिष्ठाता ठरले. वैद्यकीय अधीक्षकांच्या बंगल्याकडे अनेक वर्षांपासून कोणीही फिरकले नसल्याने त्यास भूत बंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदही रिक्त असल्याने त्यांचे निवासस्थान वापराविना पडून आहे.
बंगला वापरण्यायोग्य नाही- भोपळे
घाटीचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांना बंगल्यात का राहत नाहीत, असे विचारले असता ते म्हणााले की, हा बंगला पावसाळ्यात गळतो. वापरायोग्य राहिला नाही. दहा वर्षांपासून तेथे एकही अधिष्ठाता राहिला नाही. मध्यंतरी तीन-चार वर्षे मेडिसीन विभागाचे तेथे कार्यालय होते. या बंगल्याची दुरुस्ती करण्यासंबंधी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले आहे. मात्र, त्यांनी अद्याप कोणतेही काम केले नाही.