सातव्या दिवशी बाजार समितीत निघाला सौदा
By Admin | Updated: May 8, 2017 23:34 IST2017-05-08T23:32:01+5:302017-05-08T23:34:07+5:30
लातूर : सातव्या दिवशी बाजार समिती प्रशासन, खरेदीदार, हमाल संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्तांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला.

सातव्या दिवशी बाजार समितीत निघाला सौदा
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या हमाल, मापाडी, गाडीवान आणि इतर कामगारांच्या हमालीचे दर वाढवून मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. शिवाय, ६० हजार क्विंटल शेतमालही जाग्यावर पडून होता. सातव्या दिवशी बाजार समिती प्रशासन, खरेदीदार, हमाल संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्तांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. त्यामुळे सातव्या दिवशी लातूरच्या बाजार समितीत शेतीमालाचा सौदा झाला आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास तीन हजार हमाल, मापाडी, गाडीवान आणि इतर कामगार काम करतात. गेल्या सहा वर्षांपासून या कामगारांची मजुरी वाढविण्यात आली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचे कारण पुढे करीत मजुरीची दरवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे बाजार समितीत काम करणाऱ्या हमाल, मापाडी, गाडीवानांनी गेल्या सात दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा सोमवारी सातवा दिवस होता. दरम्यान, या सात दिवसांत बाजार समिती प्रशासनाने व्यापारी-खरेदीदार आणि हमाल संघटनांमध्ये मध्यस्थी करीत तीन बैठका घेतल्या होत्या. मात्र या तिन्ही बैठकांमध्ये कुठलाही तोडगा निघाला नव्हता. या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांकडे बाजार समितीच्या सचिवांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात व्यापारी, खरेदीदार आणि हमाल संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतली होती. चौथ्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुन्हा संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात बाजार समिती, खरेदीदार, हमाल संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यापाऱ्यांकडून ३० टक्के दरवाढ मान्य करण्यात आली. इतर दरवाढ त्या-त्या कामाच्या स्वरुपानुसार देण्यात यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे बाजार समितीत सोमवारी दुपारी सौदा निघाला.