कर्णबधिर गीता आई-वडिलांना शोधण्यासाठी औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:57+5:302020-12-17T04:27:57+5:30

औरंगाबाद : चुकून बालपणी पाकिस्तानमध्ये गेलेल्या कर्णबधिर गीताला दिवंगत विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष प्रयत्न करून मायदेशी आणले. पाच ...

Deaf Gita in Aurangabad to find her parents | कर्णबधिर गीता आई-वडिलांना शोधण्यासाठी औरंगाबादेत

कर्णबधिर गीता आई-वडिलांना शोधण्यासाठी औरंगाबादेत

औरंगाबाद : चुकून बालपणी पाकिस्तानमध्ये गेलेल्या कर्णबधिर गीताला दिवंगत विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष प्रयत्न करून मायदेशी आणले. पाच वर्षांपासून इंदूर (मध्यप्रदेश) येथे राहणाऱ्या गीताच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी तिच्यासह एका स्वयंसेवी संस्थेचे सचिव आणि महिला कर्मचारी आज औरंगाबादला दाखल झाले.

पाच ते सात वर्षांची असताना (१९९९-२००० साली) कर्णबधिर गीता पाकिस्तानात पोहोचली. समझोता एक्स्प्रेसने ती गेली असावी, अथवा गुजरातमधील भारत- पाकिस्तानची सीमा ओलांडून ती चुकून पाकिस्तानमध्ये गेली असावी, असे बोलले जाते. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने गीता भारतात परतली. तेव्हापासून ती इंदूर येथील मूकबधिर सेवा संघ या संस्थेत होती. या कालावधीत तिला मूकबधिरांची भाषा शिकविण्यात आली. मात्र, तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात आला नाही. भारत सरकारने तिला भारतीय नागरिकत्व दिले आणि आवाहन करून तिच्या आई-वडिलांनी पुढे येण्याची विनंती केली होती. दरम्यान, २० जुलै रोजी ती आनंद सर्व्हिस सोसायटी या स्वयंसेवी संस्थेत दाखल झाली. तेव्हापासून गीताने तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा हट्ट धरला. मध्यप्रदेश सरकारच्या परवानगीने ज्ञानेंद्र पुरोहित हे आज गीताला घेऊन औरंगाबादेत आले.

पुरोहित यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गीताचे उजवे नाक टोचलेले आहे. तिने सांगितल्यानुसार तिच्या गावात रेल्वेस्थानक आहे. तेथे डिझेलवर चालणारी रेल्वे धावते. शिवाय रेल्वेस्थानकाजवळ नदी आणि मंदिर आहे. मंदिराबाहेर देवीची मोठी मूर्ती आहे. नदीत डुबकी मारल्यावर मंदिरात दर्शनासाठी जातात. शिवाय तिच्या गावात ऊस, भात आणि भुईमुगाची शेती केली जाते, असे तिने कर्णबधिरांच्या भाषेत सांगितले. भारतातील बहुतेक रेल्वेलाइनचे इलेक्ट्रिफिकेशन झाले आहे. मराठवाड्यातील मनमाड ते सिकंदराबाद यादरम्यान डिझेलवर रेल्वे धावते. शिवाय आंध्र प्रदेश आणि मराठवाड्याच्या सीमा भागात भात, भुईमूग आणि उसाची शेती केली जाते. याआधारे आम्ही तिला घेऊन आलो आहोत.

=====

भरोसा सेल, रेल्वे प्रवासी सेनेची मदत

गीताला घेऊन औरंगाबादेत आलेल्या ज्ञानेंद्र यांनी भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक किरण पाटील यांची भेट घेतली. तत्पूर्वी, त्यांनी रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांची भेट घेऊन गीताच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

==============

अमिताभ बच्चन यांनी केले आवाहन

गीताच्या आई-वडिलांचा शोध लागावा याकरिता सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमादरम्यान आवाहन केले आहे.

Web Title: Deaf Gita in Aurangabad to find her parents