‘कृषी स्वावलंबन’च्या लाभार्थ्यांना डेडलाईन
By Admin | Updated: May 12, 2017 23:41 IST2017-05-12T23:39:21+5:302017-05-12T23:41:23+5:30
लातूर : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहीर खोदकाम योजना आहे.

‘कृषी स्वावलंबन’च्या लाभार्थ्यांना डेडलाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहीर खोदकाम योजना आहे. मात्र शासनाने काही दिवसांपूर्वी या विहीर खोदकामाचा कालावधी दोन वर्षांवरून एक वर्षाचा केल्याने लाभार्थ्यांची अडचण झाली आहे. परिणामी, सन २०१६-१७ मध्ये विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंत खोदकाम करावे लागणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदकामासाठी अडीच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. पूर्वी या योजनेअंतर्गत विहीर खोदकामासाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी शासनाने नवीन आदेश काढत त्याचा कालावधी निम्म्यावर आणला आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये विशेष घटक योजनेंतर्गत ४८ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ११८ विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील चौघांनी आपले प्रस्ताव रद्द केले. उर्वरित १६२ लाभार्थ्यांना विहीर खोदकामाच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान, शासनाने मुदत कमी केल्याने आतापर्यंत केवळ ६५ विहिरींची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित ९३ विहिरींची कामे अद्याप सुरु झाली नाहीत. जूनअखेरपर्यंत ही कामे न झाल्यास अथवा अर्धवट झाल्यास कुठलेही अनुदान दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.