विहिरीतील ‘ते’ प्रेत पुण्यातील युवतीचे
By Admin | Updated: June 16, 2016 00:09 IST2016-06-16T00:02:18+5:302016-06-16T00:09:11+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील वाघोली शिवारात डिसेंबर २०१५ मध्ये एका बावीसवर्षीय युवतीचा गळा चिरून खून केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत पोत्यात बांधून विहिरीत फेकल्याची

विहिरीतील ‘ते’ प्रेत पुण्यातील युवतीचे
उस्मानाबाद : तालुक्यातील वाघोली शिवारात डिसेंबर २०१५ मध्ये एका बावीसवर्षीय युवतीचा गळा चिरून खून केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत पोत्यात बांधून विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना घडली होती. तब्बल सहा महिन्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, सदर मृत तरुणी पुणे येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तिच्यासोबत एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यास उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
वाघोली येथील अरुण केशव पिंगळे यांच्या शेताजवळील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत एका अनोळखी युवतीचा मृतदेह २१ डिसेंबर २०१५ रोजी आढळून आला होता. पिंगळे यांनी याबाबतची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर सदर युवतीचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार समोर आला होता. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत पोत्यात बांधून विहिरीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी त्यावेळी व्यक्त केला होता. दरम्यान, सहाय्यक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. मृत युवतीच्या कपड्यावरुन मिळालेल्या काही धाग्यादोऱ्यांच्या आधारे सदर युवती पुणे येथील कांचन परदेशी असल्याचे पुढे आले. यावरून पोलिस पथकाने पुणे येथे जावून या प्रकरणी सखोल तपास केला. या तपासाअंती परदेशी हिच्यासोबत खाजगी कंपनीत काम करणाऱ्या प्रकाश सूर्यकांत चाफेकर (वय ३६) या तरुणास पोलिसांनी मंगळवारी अटक केली. बुधवारी उस्मानाबाद न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राजतिलक रोशन यांच्या नेतृत्वाखाली पोनि कांबळे, सपोनि कदम, पोकॉ व्ही. डी. साठे, गोरोबा गाढवे, गवारे आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी काहीजणांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय असून, इतर आरोपींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.