पुरात वाहून गेलेल्या कोरडेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:05 IST2017-09-17T01:05:20+5:302017-09-17T01:05:20+5:30
चिकलठाणा येथे सुखना नदीच्या पुरात २२ वर्षीय युवकाचा मृतदेह व मोटारसायकल पुलाला अडकलेली आढळली.

पुरात वाहून गेलेल्या कोरडेचा मृतदेह सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा येथे सुखना नदीच्या पुरात २२ वर्षीय युवकाचा मृतदेह व मोटारसायकल पुलाला अडकलेली आढळली. पुरात वाहून मृत्यू झाल्याची शहरातील ही दुसरी घटना आहे.
सातारा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका फायनान्स कंपनीत मार्केटिंगचे काम करणारा तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना घडून एक दिवस उलटला नाही तोच चिकलठाणा परिसरात सुखना नदीपात्रात दुचाकीसह तरुणाचा मृतदेह आढळून आला. कृष्णा एकनाथ कोरडे (२२, रा. चिकलठाणा) हा गाडीसह काल पुरात वाहून गेला होता. नागरिकांनी शोध घेऊनही तो सापडला नव्हता. सकाळी त्याची गाडी (एमएच- २०, सीडब्ल्यू- ६९५२) आढळली. नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्यात गाडी जमा केली. कृष्णाचा शोध नागरिकांनी सुरूच ठेवला होता. दुपारी शनी मंदिराजवळील नाल्यात एक मृतदेह पाण्यात दिसला. नागरिकांनी सदरची माहिती सिडको पोलीस ठाणे व त्याच्या नातेवाईकांना दिली. मृतदेहाची ओळख पटली असून, कृष्णा कोरडेच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सिडको एमआयडीसी पोलीस मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी घाटीत घेऊन गेले.