डीसीसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये निरूत्साह
By Admin | Updated: April 11, 2015 00:21 IST2015-04-11T00:03:29+5:302015-04-11T00:21:10+5:30
शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जोरदार तयारीला लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेसचे नेते सदरील निवडणुकीसाठी

डीसीसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये निरूत्साह
शिरीष शिंदे , बीड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जोरदार तयारीला लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेसचे नेते सदरील निवडणुकीसाठी निरूत्साही असल्याचे पहावयास मिळत आहेत. राकाँने निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासाठी बैठकही बोलावली नाही अन् तशी चर्चाही केली नाही.
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची पत्नी संगीता यांनी आष्टी तालुका मतदार संघातून, बँकेचे माजी संचालक दिनकर कदम यांनी बीड मतदार संघातून, केजमधून बजरंग सोनवणे, अंबाजोगाईमधून चव्हाण यांनी तर परळीमधून नरहरराव निर्मळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादीचे असले तरी पॅनलबाबत निर्णय झालेला नाही. आपआपल्यापद्धतीने जो-तो उमेदवार निवडणूक लढवीत आहे. पॅनल नसल्याचा फायदा भाजपाच्या कार्यकर्त्यांना होणार हे निश्चित मानले जात आहे.
नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या विरोधात होणार सुनावणी
डीसीसीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून राजकीय दबाव आणून अनेक बोगस संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला आहे. त्यावर माजी संचालक जालिंदर पिसाळ व कृष्णकुमार केरुळकर यांनी आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. नोंदणी रद्द झालेल्या आणि अवसायनात निघालेल्या अनेक बोगस संस्थांचा समावेश बँकेच्या मतदार यादीत केला आहे. सदरील याचिकेवर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दैनिकामध्ये जाहीरात देऊन प्रतिवादींना बाजू मांडण्यासाठी हजर राण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ९८ उमेदवार कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ राकाँच्या कार्यकर्त्यांना होणार यात शंका नाही. बोगस संस्था स्थापन करुन त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलण्यासाठी बोगस मतदार यादीत समाविष्ठ केले आहेत. पुन्हा बनावट संस्था व मतदारांचा यादीत समावेश करण्यात आला असल्याने पुन्हा खळबळ उडली आहे. अनेकांना यादीत नावे असल्याचे माहीत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आता न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली व शुक्रवारी पात्र व अपात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सहा उमेदवारांचे नऊ अर्ज बाद करण्यात आले आहेत तर काहींनी एका पेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने ते निकाली काढण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंंगणात १६२ उमेदवार आहेत. २४ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने त्यावर सर्वांच्या नजरा टिकल्या आहेत. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. डीसीसीच्या निवडणुकीसाठी १४२३ मतदार मतदान करणार आहेत.