घरासमोर वाजवणार डफडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:50 IST2017-09-23T00:50:58+5:302017-09-23T00:50:58+5:30
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली

घरासमोर वाजवणार डफडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली. ५ आॅक्टोबरपासून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या दालनात झालेल्या या पत्रपरिषदेस माजी संचालक साहेबराव दरेकर, रमेश आडसकर, सुभाषचंद्र सारडा, अशोक पालवे, विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप हंबर्डे, अनिल सोळंके, विलास सोनवणे, विजयकुमार गंडले, सुहास पाटील, वसंतराव सानप, मधुकर ढाकणे आदी उपस्थित होते.
आडसकर म्हणाले की, बँकेने ९८८ कोटी शेतकºयांना, तर ८२ कोटी अकृषी कर्ज वाटप केले. ही आकडेवारी बघता अकृषी कर्जाची थकबाकी रक्कम १२ टक्केही नाही. आम्ही फक्त त्या ठरावावर सह्या केल्यामुळे दोषी आहोत; प्रत्यक्षात लाभ मात्र या बड्या मंडळींनीच उचलला आहे.
गेल्या काही वर्षांपासून आम्ही कोर्टाच्या चकरा मारत आहोत. बाकी मंडळी इकडे फिरकतदेखील नाहीत. जनता ही आमच्याकडे आम्हीच बँक बुडविली, या नजरेतून बघत आहे. राजकीय हेव्यादाव्यातून चांगल्या स्थितीत असलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. १० वर्षांपूर्वी अंबासाखर कारखान्याने कर्ज घेतले होते. त्या बदल्यात आम्ही मद्य प्रकल्प बँकेच्या ताब्यात दिला आणि त्याच्या विक्रीतून कर्ज वसुली करावी असे सांगितले. त्यानंतर मात्र आम्ही, आमच्या कुठल्याही संस्थेने कर्ज घेतले नाही. तरीदेखील केवळ ठरावावर सही म्हणून आम्ही दोषी ठरत आहोत. बँकेला या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आता आम्हीच पुढाकार घेतला आहे. बीड शहरातील बँकेने नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर १४०/१३ यात सात संस्थांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. त्यापैकी तांबेश्वर शेतीमाल पुरवठा संस्था, आदित्य बहुउद्देशीय संस्था, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ ट्रस्ट सोलापूर, व्यंकटेश्वर अॅग्रो शुगर शिवणी (ता. लोहा, जि. नांदेड), गजानन सहकारी साखर कारखाना, नवगण राजुरी, खंड औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था अंबाजोगाई या सहा संस्थांनी आपल्यावरील कर्ज बेबाक केले; परंतु जयभवानी सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर गढी, ता. गेवराई यांच्यावर जवळपास ३९ कोटी रुपयांचे कर्ज थकबाकीत आहे. अशी बडी मंडळी थकबाकीदारांमध्ये असून, त्याचा फटका सर्वसामान्य शेतकºयांना कर्ज मिळण्यास बसला आहे. अशा थकबाकीदार बड्या मंडळींकडील कर्जवसुलीसाठी ५ आॅक्टोबरपासून मोहीम राबविण्यात येणार असून, त्यात आम्ही सहभागी होणार आहोत, असे या सर्वांनी पत्रपरिषदेत सांगितले.