रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची पहाट
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-22T23:58:34+5:302014-07-23T00:32:07+5:30
सितम सोनवणे , लातूर लातूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ४़४५ पासून प्रवाशांची लगबग सुरु होती़ कोणी गावाला जाण्यासाठी, कोणी पाठविण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते़

रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची पहाट
सितम सोनवणे , लातूर
लातूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ४़४५ पासून प्रवाशांची लगबग सुरु होती़ कोणी गावाला जाण्यासाठी, कोणी नातेवाईकाला घेऊन जाण्यासाठी तर कोणी पाठविण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते़ आॅटोवाले, बसगाड्या व्यावसायिक यांच्यामुळे रेल्वेस्थानकाचा परिसर गजबजून गेला होता़
मंगळवारी पहाटे ४़४५ शहरात रिमझिम पाऊस सुरु होता़ त्यामुळे तुरळक प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांची ये-जा चालू होती़ शहरातून शिवाजी चौक, रेणापूर नाका, साई चौक येथून प्रवासी आॅटोने रेल्वेस्थानकाकडे येत होते़ मंगळवार असल्याने अमरावती-पुणे या गाडीसाठी प्रवासी रेल्वेस्थानकावर येण्यासाठी पहाटे ४़४५ पासूनच घराच्या बाहेर पडले होते़ रेल्वेस्थानकावर आल्यानंतर ज्यांचे आरक्षण होते, ते थेट प्लॅटफॉर्म क्र. १ वर गेले़ तर ज्यांनी तिकिट काढले नव्हते, ते तिकिट घराकडे जाऊन रांगेत तिकिट काढत होते़ तिकिट घर गर्दीने गजबजले होते़ रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. १ वर प्रवासी, त्यांचे नातेवाईक यांची रेलचेल होती़ तर काही प्रवासी अजूनही प्लॅटफॉर्मवर शांत पहुडले होते़
रेल्वेपटरीही येणाऱ्या रेल्वेची वाट पाहत होती़ रात्री मुक्कामाला आलेल्या अहमदपूर, उदगीर व निलंगा डेपोच्या बस रेल्वेस्थानकाच्या बाहेर शांतपणे उभ्या होत्या़ वाहक-चालक बसमध्ये विश्रांती घेत होते़ रिमझिम पावसामुळे रेल्वेस्थानकाच्या वातावरणात गारठा वाढला होता़ रेल्वेस्थानकाचे वातावरण रिमझिम पावसामुळे गारठून गेले होते़ रेल्वे स्थानकाच्या बाहेर चहा स्टॉलला प्रवासी, त्यांचे नातेवाईक गरम चहा पिऊन रेल्वेस्थानकाकडे येत होते़ रेल्वे स्थानकावरील स्पिकरवरून अमरावती गाडी प्लॅटफॉर्म नं़ १ वर येत असल्याची उद्घोषणा होताच पुण्याला जाणारे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्म नं़ १ वर येऊन थांबले़ काहीजण आपल्या नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी प्रतीक्षेत होते़ पुणे-अमरावती ही रेल्वे आठवड्यातून मंगळवार व रविवारी सकाळी ६ वाजता लातूर रेल्वेस्थानकावर येते़ ६़़३० ला पुण्याकडे प्रस्थान करते़ तर हिच रेल्वे पुणे - अमरावतीला जाण्यासाठी पहाटे ४ वाजता शनिवारी व सोमवारी लातूर रेल्वेस्थानकावर येते़ स्थानकावरून हिरवे सिग्नल मिळताच जोरजोरात शिट्या मारत अमरावती-पुणे ही रेल्वे प्लॅटफॉर्म नं़ १ वर आली़ लातूरला उतरणाऱ्या प्रवाशांची, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची एकच लगबग, जागा पकडण्यासाठीची धावपळ चालू होती़ मुख्य गेटवर तिकिट चेकर तिकिट चेक करण्यासाठी उभे होते़ येणाऱ्या-जाणाऱ्यांचे तिकिट चेक करूनच बाहेर जाऊ दिले जात होते़ मुंबई-लातूर रेल्वे आज ४० मिनिटे उशिरा होणार होती, तरी प्रवाशांची त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होती़
रात्रीची पाळी असल्याने रात्री येणाऱ्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर बॉक्स टाकण्याचे माझे काम आहे़ रात्रभर तीन गाड्या येऊन गेल्या़ त्यामध्ये तीन बॉक्स टाकले़ या बॉक्समध्ये लाल, हिरवे, झेंडे व ड्रायव्हरचे उपयुक्त साहित्य असते, अशी माहिती बॉक्सबॉय सालत चाऊस यांनी दिली़
लातूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत़ चहा स्टॉल नाही़ वृत्तपत्रे नाहीत़ बसण्याची व्यवस्थाही चांगली नाही़ याची प्रशासनाने दखल घेण्याची गरज असल्याचे मत उदगीरचे डॉ़ रामप्रसाद लखोटिया यांनी व्यक्त केले़