कष्टाची ही वाट दुधवाल्यांची पहाट
By Admin | Updated: July 20, 2014 00:32 IST2014-07-20T00:16:34+5:302014-07-20T00:32:30+5:30
सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणारे डेअरीवाले-दुधवाले हजारो लिटर दूध लातूर शहराला उपलब्ध करून देतात़

कष्टाची ही वाट दुधवाल्यांची पहाट
सितम सोनवणे , लातूर
जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणारे डेअरीवाले-दुधवाले हजारो लिटर दूध लातूर शहराला उपलब्ध करून देतात़ यासाठी रात्री २ वाजेपासूनच त्यांच्या कष्टाला सुरूवात होते़ आणि पहाटे ५़३० वाजता विश्रांती मिळते़ उद्यासाठीच्या कामाचे नियोजन करूनच त्यांना गावाकडे परतावे लागते़
राजीव गांधी चौकात शनिवारी पहाटे ४ वाजताचे वातावरण पथदिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाले होते़ त्यातच बब्रुवान पुजारी व विजया पुजारी यांनी आपले हॉटेल उघडून त्यापुढे पाणी मारून खुर्च्या, स्टूल, टेबल ठेऊन ग्राहकांच्या प्रतीक्षेत मोबाईलवर देवीची आरती सुरु केली़ ग्राहक येताच त्यांना चहा, पाणी दिले़ बघता-बघता लोकांची वर्दळ वाढू लागली़
पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी आलेल्या लोकांची राजीव गांधी चौकातही गर्दी झाली़ दरम्यान, औशाकडून आलेली बस चौकातून शहरात वेगाने निघून गेली़
एखादा टेम्पो राजीव गांधी चौकाला फेरी मारून नांदेड रोडकडे भरधाव वेगाने जात असे़ पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी आलेले स्त्री, पुरुष फेरफटका मारून झाल्यावर चौकात एका रांगेत उभे दिसले़ सहज उत्सुकतेपोटी त्यांना ‘तुम्ही रांगेत का उभारलात’ असे विचारले असता ‘दूध खरेदीसाठी’ आम्ही रांगेत उभे आहोत़, असे त्यांनी सांगितले़
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील दुग्ध व्यवसाय करणारे सेवानिवृत्त अपर पोलिस अधीक्षक बाजीराव शिंदे यांच्या डेअरीच्या दुधासाठी या रांगा लागल्याचे ग्राहकांनी सांगितले़ पहाटे ५़३० च्या सुमारास पाकिटबंद दुधाचा एक टेम्पो येऊन थांबला़ बघता बघता टेम्पोमधील ३०० लिटर्स दूध अवघ्या १५ ते २० मिनिटात संपले़ याबरोबरच औसा, साई, पाच नंबर पाटी, आलमला येथील दूधवालेही आपले दूध विक्री करत होते़
त्यांनी ५ ते २५ लिटरपर्यंत दूध विक्रीसाठी आणले होते़ हे दूध विक्री करून परत गावाकडे जाण्यासाठी लगबग हे दूधवाले करत होते़
डेअरीचे मालक शिंदे म्हणाले वर्ष २००७ पासून हा व्यवसाय करत असून, रात्री २ वाजेपासून या कामाला सुरूवात करतो़ मी माझे कुटुंबिय व डेअरीतील आठ कर्मचारी असा ताफा म्हशीचे शेण काढण्यापासून त्यांना धुवून, चारा टाकून, धारा काढेपर्यंत पहाटेचे ४ केव्हा वाजतात हे लक्षात येत नाही़ ४़३० वाजता सर्व पाकिटबंद दूध गाडीत टाकून गाडी लातूरच्या दिशेने निघते ५़३० वाजता राजीव गांधी चौकात पोहोचतो़ पंधरा ते वीस मिनिटात ३०० लिटर दूध संपते़
हा नित्य उपक्रम ठरला आहे़ साईचे सचिन पवार सांगतात ८ म्हशीचे ४ वाजल्यापासून सर्व कामे आटोपून २५ लिटर दूध घेऊन ५ वाजता राजीव गांधी चौकात येतो़ सुनीता सुरवसे या ११ लिटर दूध विक्रीसाठी आल्या होत्या़ औशाचा गफार सय्यद हा शालेय विद्यार्थी ७ लिटर दूध घेऊन आला होता़
मागील तीन वर्षांपासून छत्रपती नगरमधील घरातून ४ वाजता बाहेर पडतो़ या दुधासाठी रांगेत थांबून दूध घेऊन जातो, असे ग्राहक एस़डी़पाटील यांनी सांगितले़
दुग्ध व्यवसायात कष्ट, परिश्रम करावेच लागतात़ मुलगा बी.ई. मेकॅनिकल असूनही नोकरी न करता या व्यवसायाकडे वळला आहे, असे दूध उत्पादक बाजीराव शिंदे यांनी सांगितले़