गांधी चौकात विसावते ड्रायव्हरांची पहाट

By Admin | Updated: July 19, 2014 00:41 IST2014-07-18T23:54:31+5:302014-07-19T00:41:23+5:30

सितम सोनवणे, लातूर पहाटेच्या वेळी लातुरात ट्रॅव्हल्स येण्याची गर्दी असते़ बहुतांश ट्रॅव्हल्स गांधी चौकात शेवटचा टप्पा पूर्ण करतात़ लोकांचा दिवस सुरु होत

The dawn of drivers who live in Gandhi Chowk | गांधी चौकात विसावते ड्रायव्हरांची पहाट

गांधी चौकात विसावते ड्रायव्हरांची पहाट

सितम सोनवणे, लातूर
पहाटेच्या वेळी लातुरात ट्रॅव्हल्स येण्याची गर्दी असते़ बहुतांश ट्रॅव्हल्स गांधी चौकात शेवटचा टप्पा पूर्ण करतात़ लोकांचा दिवस सुरु होत असतानाच ट्रॅव्हल्सचालकांची पहाट मात्र गांधी चौकात विसावते़ प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत रात्रभराचा प्रवास पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते़
गांधी चौकात शुक्रवारी पहाटे ४ वाजता वातावरण एकदम शांत होते़ बाहेरगावाहून आलेली बस गांधी चौक मार्गे बसस्थानकाकडे भुर्रकन निघून जातात़ एखादा आॅटो बसस्थानकाकडून गांधी चौकात येऊन पुढे शिवाजी चौकाकडे जातो़ झाडावर शांत झोपलेले पक्षी गाडीच्या आवाजाने किलबिलाट करतात़ तुरळक माणसांची वर्दळही सुरु असते़ गांधी चौकातील शांतता, आॅटो - बस यांच्या आवाजाने भंग होत होती़ त्यामध्ये अचानकच पाण्याच्या टाकीजवळ एक मोकाट कुत्र्यांचा घोळका मोठमोठ्याने भुंकत एकमेकांच्या अंगावर जात होता़ औरंगाबाद येथून आलेली ट्रॅव्हल्स गांधी चौकात थांबली़ ती थांबताच शेवटच्या टप्प्यातील सर्व प्रवाशी उतरले़
प्रवाशी खाली उतरताना पाहून ४-५ आॅटोंचा गराडा ट्रॅव्हल्सच्या अवतीभोवती फिरू लागला़ प्रवाशी व आॅटोचालकांत चर्चा होते, भाडे ठरते़ प्रवासी आॅटोत बसून, कुटुंबियांसह घराकडे निघून जातात़ पहाटे ४ पासूनच प्रवाशांच्या प्रतिक्षेत असणारे आॅटोचालक प्रवाशी मिळाले की, पहिला ग्राहक म्हणून जास्त आढेवेढे न घेता पटकन प्रवाशांना घेऊन निघून जातात़ भाजी मार्केटसाठी निघालेले हातगाडे गांधी चौकातूनच पुढे जुन्या बसस्थानकाच्या रस्त्याने निघून जात होते़ मॉर्निंग वॉकसाठी महिला, पुरुष, काहीजण परिवारासह फिरताना दिसून आले़ जाताजाता महालक्ष्मी मंदिरासमोर नतमस्तक होऊन पुढे जात़ बसस्थानकाकडून आलेली पोलिस जीप गांधी चौकाला फेरी मारून पोलिस ठाण्याकडे गेली़
पहाटे ५ नंतर ट्रॅव्हल्स येण्याची संख्या वाढत गेली़ या ट्रॅव्हल्स औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, लातुरलाच थांबणाऱ्या तर काही पुढे अहमदपूर, उदगीर, नादेंडला जाणाऱ्या पुढे निघून जात़ ज्या ट्रॅव्हल्स लातूरच्या आहेत, त्यातील सर्व प्रवाशी उतरले की, ट्रॅव्हल्स आपल्या त्यांच्या-त्यांच्या आॅफिससमोर थांबतात़ ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर हा प्रवास चांगला झाल्याचे समाधान व्यक्त करत तोही त्यांच्या कार्यालयात विसावतो़
दिवसभर चांगली झोप झाली तर रात्रीचा प्रवास सुखकर होतो़ त्याची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे़ नाशिकहून येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा १२ तासाचा प्रवास होतो़ यात २ ड्रायव्हर असतात़ अदलून बदलून गाडी चालवत प्रवाशांची सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी असल्याने ही व्यवस्था करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ प्रवासात निष्काळजीपणा दुर्लक्ष करून चालत नाही़ त्यासाठी काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करणे आमची जबाबदारी असते, असे ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरांनी सांगितले़
प्रवाशांची सुरक्षा ही पुर्णत: चालकांवर अवलंबून असते़ त्यामुळे त्यांची झोप पूर्णपणे होणे व तो निर्व्यसनी असणे गरजेचे आहे, असे मत लातुरात उतरलेले प्रवासी प्रा़ भोसले यांनी यावेळी व्यक्त केले़
ट्रॅव्हल्सचालक सतीश चव्हाण म्हणाले, औरंगाबाद येथून रात्री १२ वाजता निघालो होतो़ पहाटे ५ वाजता आलो आहे़ आता दिवसभर आराम करून रात्री १२ वाजता परतीचा प्रवास करायचा आहे़

Web Title: The dawn of drivers who live in Gandhi Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.