दौलताबादला पोलीस ठाणे सुरु
By Admin | Updated: September 8, 2014 00:36 IST2014-09-08T00:10:12+5:302014-09-08T00:36:04+5:30
दौलताबाद : औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील मिळून २३ गावे आणि ५५ हजार लोकसंख्येसाठी दौलताबाद येथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले

दौलताबादला पोलीस ठाणे सुरु
दौलताबाद : औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील मिळून २३ गावे आणि ५५ हजार लोकसंख्येसाठी दौलताबाद येथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले असून, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांच्या हस्ते रविवारी ठाण्याचे उद्घाटन करून ठाण्याच्या कारभाराला सुरुवात करण्यात आली.
उद्घाटन कार्यक्रमाला पोलीस उपआयुक्त अरविंद चावरिया, वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त रामराव हाके आदींची उपस्थिती होती. ऐतिहासिक दौलताबाद किल्ला, परिसराची वाढती लोकसंख्या, महामार्गावर होणारे अपघात, पर्यटन स्थळांचे वाढते महत्त्व या सर्व बाबींचा विचार करून गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी या नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. यासाठी माजी जि. प. सदस्य विनोद पाटील यांनी मागणी केली होती.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आयुक्त म्हणाले, छावणी पोलीस ठाण्याची हद्द खूप मोठी झाली होती. त्यामुळे आम्ही दौलताबादला पोलीस ठाणे मागितले होते. याशिवाय हर्सूल येथेही पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. यापैकी आम्ही दौलताबादला प्राधान्य दिले. या ठाण्यातील पोलिसांनी लोकांचा विश्वास जिंकण्याचे काम करावे. पोलीस निरीक्षकांनी
आपला भ्रमणध्वनी क्रमांक सर्वांना द्यावा. यावेळी सरपंच संजय कांजुणे, उपसरपंच सय्यद हारुण, अब्दीमंडीचे मा. सरपंच दौलतसिंग हजारी, शेख वहीद, दादासाहेब म्हस्के, गोरक्षनाथ राऊत, सय्यद सलीम, के.के. जाधव, बी.के. पठाण यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक पोलीस निरीक्षक धनंजय येरुळकर यांनी तर सूत्रसंचालन डी.के. पैठणे यांनी केले. आभार सहायक पोलीस आयुक्त रामराव हाके यांनी मानले. (वार्ताहर)
या गावांचा समावेश
औरंगाबाद तालुका : दौलताबाद, माळीवाडा, अब्दीमंडी, केसापुरी, शरणापूर, धरमपूर, करोडी, शिरसमाळ, जटवाडा, वंजारवाडी, रामपुरी
गंगापूर तालुका : जांभळा, पोटूळ, कदीम टाकळी, टाकळीवाडी, आसेगाव, शहापूर बंजर, सिंधी खिरसगाव, फतुलाबाद, रसूलपुरा
असा असेल स्टाफ
धनंजय येरुळकर (पोलीस निरीक्षक), डी.बी. कोकनर (फौजदार), बी.के. पाचोळे (फौजदार) दोघे अजून हजर झालेले नाहीत.
४५ पोलीस कर्मचारी