छत्रपती संभाजीनगर : रविवारी रात्री कार्यक्रम आटोपून घरी आलो तेव्हा अचानक वीज गेली आणि तेवढ्यात एक तरुण घरात घुसला. तो गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याला कोणी सुपारी दिली का, असा संशय असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले, आधी मला ही किरकोळ घटना वाटली. पण, प्रकरण गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. सौरभ अनिल भोले असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा आणि बनावट नोटा प्रकरणांत गुन्हा नोंद आहे. रात्री ११ वाजता असे येणे म्हणजे त्याचा काही तरी हेतू आहे. तो पोलिसांना धमकी देत होता. जोपर्यंत सत्यता समोर येणार नाही, तोपर्यंत मी कुणाचेही नाव घेणार नाही. मला अतिरिक्त सुरक्षेची गरज नाही. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी असल्याचे शिरसाट म्हणाले. ज्या वेळेस मी घरी आलो, त्याच वेळेस वीज गेली आणि घरातील सीसीटीव्ही बंद झाले. काही सेकंदात जनरेटर सुरू झाले, तेवढ्यात हे सर्व झाले. सीसीटीव्ही पुन्हा सुरू होण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतात. राजकारणात असे प्रकार घडतात. आता यापुढे सावध राहणार असल्याचे शिरसाट म्हणाले.
आपल्यावर सर्वांची नजर असते हे कळलेविधिमंडळ सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ काढणाऱ्याची कमाल आहे. तसे करणे योग्य नाही, मात्र सर्वांची आपल्याकडे नजर असते, हे आपल्याला कळल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
कारागृहात मैत्री झालेल्यांसोबत पार्टीनंतर घडला प्रकार३०-३० घोटाळ्यात अटकेत असलेल्या पंकज जाधवसोबत सौरभची हर्सूल कारागृहात मैत्री झाली. पंकजही नुकताच बाहेर आल्याने रविवारी सौरभसोबत ते सुधाकरनगर रस्त्यावरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी भेटले. तेथे दारू पिऊन पंकजच्या कारने सोलापूर -धुळे महामार्गावर गेले. पंकज लिंक रोड परिसरातच राहतो. सौरभची दुचाकी तेथेच ठेऊन रात्री १०.३० वाजता ते घरी परतले. तेथून सौरभ दुचाकीने निघाला. त्याच दरम्यान शिरसाट यांचा ताफा येताच तो त्यात घुसला व थेट शिरसाट यांच्या घरापर्यंत पोहोचून पोलिसांना भिडला. शिरसाट यांच्या ताफ्यात पोलिसांची जवळपास ४ वाहने व १२ पोलिस असतात तर घराच्या सुरक्षेसाठी ४ अंमलदार तैनात असतात. निरीक्षक संभाजी पवार, संग्राम ताटे, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी सौरभची रात्री उशिरापर्यंत कसुन चौकशी केली.